वर्मा-शर्माची फटकेबाजी

आज एकाच दिवशी हिंदुस्थानी संघात फटकेबाजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. तिलक वर्मा आणि अभिषेक शर्मा या वर्मा-शर्माच्या युवा जोडीने दक्षिण आफ्रिकन गोलंदाजीच्या चिंधडय़ा उडवत तिसऱया टी-20 सामन्यात 6 बाद 219 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. तिलक वर्माने आपल्या अभिषेक शर्मासह 107 धावांची झंझावाती भागी रचल्यानंतर आपले पहिले-वहिले टी-20 आणि आंतरराष्ट्रीय घणाघाती शतक साजरे केले. तसेच तो कमी वयात कमी वयात टी-20 शतक झळकावणारा दुसराच हिंदुस्थानी फलंदाज ठरला.

आजही दक्षिण आफ्रिकेनेच टॉस जिंकला आणि हिंदुस्थानला फलंदाजी दिली. पहिल्या सामन्यात 107 धावांची नेत्रदिपक खेळी करणारा संजू सॅमसन सलग दुसऱया सामन्यातही शून्यावर बाद झाला. मग वर्मा आणि शर्मा आफ्रिकन गोलंदाजांवर तुटून पडले. त्यांनी 52 चेंडूंत 107 धावांची भागी रचली. अभिषेक 25 चेंडूंत 50 धावा करून बाद झाला. त्याने या खेळीत 5 षटकार आणि 3 चौकार ठोकले. मग तिलकने 51 चेंडूंत शतक साजरे करताना 7 षटकार आणि 8 चौकार लगावले. तसचे पदार्पणवीर रमणदीप सिंहने आपल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय चेंडूवर षटकार ठोकण्याचा पराक्रम केला. शेवटच्या षटकांत केवळ चार धावा काढणाऱया हिंदुस्थानने त्याआधी पाच षटकांत 77 धावा फोडून काढल्या होत्या.