दक्षिण आफ्रिकेने सामना फिरवला; स्टब्ज-कोत्झीच्या तुफान भागीमुळे आफ्रिकेची मालिकेत बरोबरी

वरुण चक्रवर्तीच्या फिरकीने हिंदुस्थानला थेट विजयाच्या उंबरठय़ावर नेले होते. 7 बाद 86 अशा भीषण अवस्थेनंतर हिंदुस्थान दुसराही सामना जिंकण्याच्या दिशेने धावत होता, तेव्हा ट्रिस्टन स्टब्ज आणि जिराल्ड कोत्झीने 20 चेंडूंत केलेल्या 42 धावांच्या भागीने हिंदुस्थानच्या विजयाचा घासच हिरावून घेतला. दक्षिण आफ्रिकेने 125 धावांचे लक्ष्य 6 चेंडू आधीच गाठत चार सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.

हिंदुस्थानच्या 125 धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची चांगलीच दमछाक झाली. रायन रिकल्टन (13) आणि रिझा हेंड्रिक्स (24) यांनी चांगली सलामी देण्याचा प्रयत्न केला. वरुण चक्रवर्तीच्या फिरकीने चार फलंदाजांचे त्रिफळे उडवत विजय हिंदुस्थानच्या बाजूने झुकवला होता. त्याने 17 धावांत अर्धा संघ गारद करत यजमानांची 7 बाद 86 अशी बिकट अवस्था केली होती. पण तेव्हाच फलंदाजीला आलेल्या जिराल्ड कोत्झीने अर्शदीपला खेचलेल्या उत्तुंग षटकाराने सामन्याचा नूरच पालटून टाकला. त्यानंतर स्टब्ज-कोत्झीने 7 चौकारांची बरसात करत संघाच्या विजयावर 19 व्या षटकातच मोहोर उमटवली. स्टब्जने 47 तर कोत्झीने 19 धावा ठोकल्या.

त्याआधी गेल्या सामन्यात चौकार-षटकारांची आतषबाजी करत 200 धावांचा टप्पा गाठणाऱया हिंदुस्थानी संघाला यजमान दक्षिण आफ्रिकेने 124 धावांत रोखले होते. विशेष म्हणजे, हिंदुस्थानच्या एकाही फलंदाजाला धावांची चाळिशीही गाठता आली नाही.

सलग दुसऱया सामन्यातही दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकला आणि हिंदुस्थानलाच फलंदाजीची संधी दिली. गेल्या सामन्यात संजू सॅमसनने आफ्रिकन गोलंदाजीच्या चिंधडय़ा उडवत चौकार-षटकारांची आतषबाजी केली होती. झंझावाती शतक ठोकले होते. मात्र आज त्याच संजूला पहिल्याच षटकात मार्को यानसनने भोपळासुद्धा फोडू दिला नाही. या सनसनाटी सुरुवातीनंतर हिंदुस्थानी डावाला मोठे भगदाड पडले, जे कुणीही बुजवू शकले नाही.

15 धावांतच आघाडीची फळी उद्ध्वस्त

सामन्याच्या तिसऱयाच चेंडूवर संजू त्रिफळाचीत झाला आणि पुढे अभिषेक शर्मा (4) आणि कर्णधार सूर्यकुमार यादवनेही (4) घोर निराशा केली. त्यानंतर तिलक वर्मा (20), अक्षर पटेल (27) आणि हार्दिक पंडय़ा (39) यांनी दोन अंकी धावसंख्या उभारली, पण तिघेही प्रचंड दडपणाखाली खेळत असल्यासारखे भासले. त्यातच आफ्रिकेच्या प्रत्येक गोलंदाजाने अचूक मारा करत हिंदुस्थानी फलंदाजीवर लगाम लावल्यामुळे पूर्ण डावात केवळ दोनच षटकार पाहता आले. हार्दिकने शेवटच्या क्षणी काही चांगले फटके लगावल्यामुळे हिंदुस्थान सहाच्या पुढे धावगती घेऊन जाऊ शकला.