हिंदुस्थान आणि न्यूझीलंड संघातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना मुंबईतील वानखेडे मैदानावर सुरू आहे. हा सामना रोमांचक वळणावर आला आहे. आतापर्यंत अवघा दोन दिवसांचा खेळ झाला असून तब्बल 29 विकेट्स पडल्या आहेत. दुसऱ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडने 9 विकेट्स गमावून 171 धावांपर्यंत मजल मारली होती. एजाज पटेल 7 धावांवर नाबाद असून न्यूझीलंडकडे 143 धावांची आघाडी आहे.
तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडचे शेपूट वळवळण्याआधीच हिंदुस्थानला शेवटचा गडी झटपट बाद करावा लागणार आहे. त्यामुळे छोट्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करून मालिकेचा शेवट गोड करण्याची संधी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या हिंदुस्थानकडे आहे. मात्र वानखेडेवर चौथ्या डावात धावांचा पाठलाग करणे एवढे सोपेही नाही. आकडेवारीही याची साक्ष देते. चौथ्या डावात फक्त एकदाच 100 हून अधिक धावांचा या मैदानावर यशस्वी पाठलाग करण्यात आलेला आहे. 2000 साली दक्षिण आफ्रिकेने हा कारनामा केला होता.
जवळपास 24 वर्षांपूर्वी वानखेडेवर दक्षिण आफ्रिकेने 6 विकेट्स गमावून 163 धावांचे आव्हान पार केले होते. आता याच कामगिरीचा गित्ता हिंदुस्थानच्या संघाला गिरवावा लागणार आहे. या मैदानावर हिंदुस्थानने फक्त एकदाच चौथ्या डावात आव्हानाचा पाठलाग यशस्वीरित्या केला आहे. 1984 मध्ये हिंदुस्थानने इंग्लंडच्या संघाने दिलेले 48 धावांचे आव्हान 2 विकेट्स गमावून पूर्ण करत सामना जिंकला होता.
Stumps on Day 2 in Mumbai!
A fine bowling display from #TeamIndia as New Zealand reach 171/9 in the 2nd innings.
See you tomorrow for Day 3 action 👋
Scorecard – https://t.co/KNIvTEy04z#INDvNZ | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/zJcPNgGWuJ
— BCCI (@BCCI) November 2, 2024
कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत फक्त पाच वेळा वानखेडेवर धावांचा पाठलाग यशस्वीरित्या करण्यात आलेला आहे. वानखेडेची खेळपट्टी फिरकीपटूंना साथ देणारी असून चौथ्या डावात हिंदुस्थानी संघाला न्यूझीलंडच्या एजाज पटेल, ईश सोढी, फिलिप्स या फिरकीपटूंचा सामना करावा लागणार आहे. रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल या जोडीने धमाकेदार सुरुवात करून दिल्यास हिंदुस्थानला हा सामना जिंकणे जड जाणार नाही हे नक्की.
वानखेडेवर धावांचा यशस्वी पाठलाग
164/6 साउथ आफ्रिका vs हिंदुस्थान (2000)
98/0 इंग्लंड vs हिंदुस्थान (1980)
58/0 इंग्लंड vs हिंदुस्थान (2012)
51/2 हिंदुस्थान vs इंग्लैंड (1984)
47/0 ऑस्ट्रेलिया vs हिंदुस्थान (2001)