
Champions Trophy 2025 मध्ये रविवारी टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सामना रंगला. हा सामना खूप रोमांचक ठरला. या सामन्यात हिंदुस्थानी संघाने 44 धावांनी विजय मिळवला आहे. Champions Trophy मध्ये टीम इंडियाने सलग तिसरा सामना जिंकला आहे. या सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडला विजयासाठी 250 धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र, न्यूझीलंडचा संघ 205 धावातच गारद झाला. या सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवत अ गटात अव्वल स्थान पटकावले आहे. दोन्ही संघ आधीच उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. या सामन्यातील विजेता संघ उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाशी सामना करेल. आता टीम इंडियाने विजय मिळवल्याने टीम इंडियाचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. तर न्यूझीलंडचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे.
लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात चांगली झाली नाही. रचिन रवींद्रची विकेट स्वस्तात गमावली. हार्दिक पंड्याच्या चेंडूवर रवींद्र अक्षर पटेलकडून झेलबाद झाला. त्यानंतर दुसरा सलामीवीर विल यंगला देखील वरुण चक्रवर्तीने बाद केले. अडखळत सुरुवात झालेला न्यूझीलंडचा संघ 205 धावातच गारद झाला आणि टीम इंडियाचा 44 धावांनी विजय झाला.
याआधी नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाची फलंदाजी अगदीच सुमार राहिली. श्रेयस अय्यर, अक्षर पटेल आणि हार्दिकने केलेल्या फटकेबाजीमुळे टीम इंडियाला 9 गड्यांच्या मोबदल्यात 249 धावांपर्यंत मजल मारण्यात यश आले. नाणेफेक गमावल्यानंतर टीम इंडियाला फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आले. प्रथम फलंदाजी करताना 300+ धावसंख्या करण्याची टीम इंडियाचा संधी होती. परंतु न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी अचूक मारा करत टीम इंडियाला सुरुवातीलाच मोठे हादरे दिले. 30 या धावसंख्येवर संघाच्या तीन विकेट गेल्या होत्या. रोहित (15), शुभमन गिल (2) आणि विराट कोहली (11 धावा) स्वस्तात माघारी परतले. परंतु त्यानंर श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल यांनी खिंड लढवत संघाला मजबूत स्थितीम आणले. श्रेयसने 4 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 79 धावा चोपून काढल्या. तसेच अक्षर पटेलने सुद्धा 42 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्यानंर फलंदाजीसाठी आलेल्या केएल राहुल (23) आणि रविंद्र जडेजा (16) यांनी धावसंख्येत किंचीत भर घातली त्यामुळे टीम इंडियाला 9 गड्यांच्या मोबदल्यात 249 धावांपर्यंत मजल मारण्यात यश आले.
न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीने भेदक मारा करत टीम इंडियाचा अर्धा संघ तंबुत धाडला. त्याने 42 धावा देत सर्वाधिक 5 विकेट घेतल्या. तसेच जेमीसन, ओरोर्क, सँटनर आणि रचिन रवींद्र यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली