हिंदुस्थानने नागपूर जिंकले, इंग्लंडचा 4 विकेटनी पराभव

शुभमन गिलच्या तडाखेबंद 87, श्रेयस अय्यरच्या 59 आणि अक्षर पटेलच्या 52 धावांच्या फटकेबाजीच्या जोरावर हिंदुस्थानने इंग्लंडविरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना 68 चेंडू आणि 4 विकेट राखून जिंकला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. आता रविवारी कटकच्या बाराबती स्टेडियमवर दुसरा सामना खेळला जाईल.

चॅम्पियन्स ट्रॉफीचा पेपर सोडवण्यासाठी आजपासून सुरू झालेल्या पूर्वतयारीचा पहिला सामना अपेक्षेप्रमाणे रंगलाच नाही. फिल सॉल्ट आणि बेन डकेटने 75 धावांची सलामी दिली. पण त्यानंतर ज्यो रुट आणि हॅरी ब्रुक लवकर बाद झाल्यामुळे इंग्लंडची 4 बाद 111 अशी स्थिती झाली. मात्र कर्णधार जोस बटलर (52) आणि जेकब बेथेलने (51) पाचव्या विकेटसाठी 59 धावांची भागी रचली, पण या भागीनंतर इंग्लंडचा डाव कुणीही सावरू शकला नाही. रवींद्र जाडेजाने 26 धावांत 3 विकेट घेतल्यामुळे 48 व्या षटकात 248 धावांवर इंग्लंडचा डाव आटोपला. मग 249 धावांचा पाठलाग करताना पदार्पणवीर यशस्वी जैसवाल (15) आणि रोहित शर्माच्या (2) अपयशानंतर शुभमन गिलने श्रेयस अय्यरच्या साथीने 94 धावांची तर अक्षर पटेलबरोबर 108 धावांची भागी रचत हिंदुस्थानला एकतर्फी विजय मिळवून दिला.