टी-20 चा पेपर 4-1 असा सोडवल्यानंतर आता हिंदुस्थानचा संघ चॅम्पियन्स ट्रॉफीची पूर्वपरीक्षा असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज झाला आहे. टी-20 मालिकेतील फॉर्म वन डे मालिकेतही कायम ठेवण्यासाठी हिंदुस्थानी संघ अनुभवी दिग्गज आणि नव्या दमाच्या खेळाडूंसह उतरणार आहे तर इंग्लंडनेही टी-20 मालिकेतील अपयश धुऊन काढण्याचे ध्येय समोर ठेवले आहे. त्यामुळे वन डेतही धावांचा जोरदार धमाका अपेक्षित आहे.
येत्या 19 फेब्रुवारीपासून पाकिस्तान आणि दुबईत चॅम्पियन्स ट्रॉफीला प्रारंभ होतोय. या स्पर्धेत हिंदुस्थानचे सर्व साखळी सामने दुबईत खेळले जाणार आहेत. तब्बल सात वर्षांनंतर पुन्हा एकदा चॅम्पियन्स ट्रॉफी खेळविली जाणार आहे. हिंदुस्थानला 2017 साली झालेल्या शेवटच्या चॅम्पियन्स स्पर्धेत जेतेपदाच्या लढतीत पाकिस्तानकडून पराभवाची झळ बसली होती. आयसीसीची तीच एकमेव स्पर्धा होती, ज्यात हिंदुस्थानी संघ पाकिस्तानविरुद्ध हरला आहे. आता ते अपयश धुऊन काढण्यासाठी रोहित शर्माचा संघ पुन्हा एकदा स्वतःला सज्ज करतोय. या स्पर्धेत जोरदार कामगिरी करण्यासाठी हिंदुस्थानला गुरुवारपासून सुरू होणाऱ्या वन डे मालिकेत खणखणीत खेळ करावाच लागणार आहे. टी-20 हिंदुस्थानसाठी अभिषेक शर्मा आणि वरुण चक्रवर्थी या दोघांनी सुसाट कामगिरी केली होती. अभिषेक शर्मा तर संघात बसू शकला नाही, मात्र वरुण चक्रवर्थीला शेवटच्या क्षणी संघात स्थान देण्यात आले आहे. जसप्रीत बुमराला पूर्ण मालिकेसाठी विश्रांती देण्यात आल्यामुळे ताजातवाना होऊन थेट दुबई गाठेल.
रोहित–विराटवर सर्वांच्या नजरा
ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेत अपयशी कामगिरीमुळे रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या कारकीर्दीबाबत साशंकता निर्माण झाली होती. मात्र तो निर्णय तूर्तास लांबणीवर पडला असला तरी आता त्यांना वन डे क्रिकेटमध्ये आपल्या बॅटची कमाल दाखवावीच लागणार आहे. विशेष म्हणजे याच क्रिकेटमध्ये या दोन्ही महान फलंदाजांनी अनेक विश्वविक्रम रचले आहेत. त्यामुळे त्याच्या कारकीर्दीवर असलेले निवृत्तीचे सावट दूर करण्यासाठी हाच फॉरमॅट त्यांच्या मदतीला धावून येऊ शकतो. त्यामुळे रोहित-विराटच्या बॅटमधून निघणाऱ्या चौकार-षटकारांसाठी क्रिकेटप्रेमी आसुसलेले आहेत.