टीम इंडियाचे मालिकाविजयाचे लक्ष्य; साऱ्यांचे रोहित, विराटवर लक्ष

टी-20 ची धम्माल वन डे मालिकेतही कायम राखण्यासाठी हिंदुस्थानचा अनुभवी संघ जामठा मैदानावर उतरतोय. आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या युद्धापूर्वी स्वतःला तयार करण्यासाठी हिंदुस्थानसह इंग्लंडचा संघही सज्ज झाला आहे. मात्र या मालिकेत दोन्ही संघांचे लक्ष्य विजयाचे असले तरी अवघ्या हिंदुस्थानी क्रिकेटप्रेमींचे लक्ष रोहित शर्मा आणि विराट कोहली या दिग्गज फलंदाजांच्या कामगिरीवर लागले आहे.

जैसवालचे पदार्पण लांब

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत अपयशी ठरलेला रोहित शर्मा आपल्या आवडत्या वन डे फॉरमॅटमध्ये पुन्हा एकदा सलामीला उतरणार असल्यामुळे त्याच्यासोबत शुभमन गिलला संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे गेले दोन वर्षे कसोटी आणि टी-20 क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडणाऱया यशस्वी जैसवालसाठी वन डे पदार्पण अजून दूर असल्याचे कळते. तिसऱया स्थानावर विराट कोहली असल्यामुळे जैसवालसाठी संघात स्थान कठीण आहे. मात्र के. एल. राहुल आपले ग्लोव्हज काढून मधल्या फळीत खेळणार हे निश्चित आहे. तसेच श्रेयस अय्यरही दीड वर्षानंतर संघात पुनरागमन करण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे रवींद्र जाडेजा आणि हार्दिक पंडय़ाचे अष्टपैलूत्व संघासाठी महत्त्वाचे आहे.

वरुण पदार्पण करणार

इंग्लंडविरुद्धच्या पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेत 14 विकेट टिकून खळबळ माजवणाऱया वरुण चक्रवर्थीची शेवटच्या क्षणी हिंदुस्थानी संघात एण्ट्री झाली आहे. त्यामुळे त्याचा फॉर्म त्याला नागपूरला वन डे पदार्पणाची संधी देणार, हे जवळजवळ निश्चित झाले आहे. त्याच्या समावेशामुळे कुलदीप यादवला बाहेर बसावे लागणार आहे. मात्र वॉशिंग्टन सुंदरला अंतिम अकरा खेळाडूंमध्ये खेळविण्याचा निर्णयही संघव्यवस्थापनाने जवळजवळ घेतला आहे.

गोलंदाजीची धुरा शमी-अर्शदीपच्या खांद्यावर

सव्वा वर्षाच्या विश्रांतीनंतर मोहम्मद शमी हिंदुस्थानी संघात परतला असला तरी त्याला टी-20 मालिकेत फार काही करता आले नव्हते. मात्र वन डे मालिकेत शमीवर हिंदुस्थानची गोलंदाजीची मदार असेल. तसेच अर्शदीप सिंगचा फॉर्मही संघासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून हार्दिक पंडय़ा आहेच, पण संघात कामचलाऊ गोलंदाज म्हणूनच त्याला गोलंदाजीचा स्पेल टाकावा लागणार आहे.

रुट आला रे…

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तयारीसाठी इंग्लंड संघाने आपला सर्वात यशस्वी फलंदाज ज्यो रुटला संघात स्थान दिले आहे. कर्णधार बटलरने संघात फारसे बदल केले नसून टी-20 तील अपयशी खेळाडूंनाच कायम ठेवले आहे. त्यामुळे त्यांच्या कामगिरीत किती फरक पडेल, याबाबत साशंकता आहे.

पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी उभय संघ

हिंदुस्थान – रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के. एल. राहुल, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), हार्दिक पंडय़ा, रवींद्र जाडेजा, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्थी. n इंग्लंड ः जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रुक, बेन डकेट, ज्यो रुट, फिल सॉल्ट, जॅमी स्मिथ, जेकब बॅथल, ब्रायडन कार्स, लिआम लिव्हिंगस्टोन, जोफ्रा आर्चर, साकिब महमूद, आदिल राशीद.