![rohit sharma (1)](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/rohit-sharma-1-696x447.jpg)
कर्णधार रोहितचा धावांचा दुष्काळ संपला. कटकच्या बाराबती स्टेडियमवर 90 चेंडूंत 119 धावांची टकाटक शतकी खेळी करत हिंदुस्थानला सलग दुसऱ्या विजयासह इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत 2-0 ने विजयी आघाडीही मिळवून दिली. आता अहमदाबादला होणारा तिसरा सामना औपचारिकता पूर्ण करणारा ठरणार आहे.
गेल्या काही महिन्यांपासून बॅटमधून धावा निघत नसल्याने रोहित शर्मावर टीकांचे अस्त्र सोडले जात होते, पण आज त्याने कटकमध्ये सलग तिसरी आक्रमक खेळी करताना 7 षटकार आणि 12 चौकारांची बरसात करत आपल्या विरोधकांची बोलतीच बंद केली. आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तोंडावर हिटमॅनचा फॉर्म प्रतिस्पर्ध्यावर आदळल्यामुळे हिंदुस्थानी संघ आणि चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. मात्र विराट कोहली आजही स्वस्तात बाद झाल्याने त्याने धाकधूक वाढवली आहे.
इंग्लंडच्या 305 धावांच्या जबरदस्त आव्हानाचा रोहितच्या बॅटने अक्षरशः चेंदामेंदा केला. त्याने शुभमन गिलच्या (60) साथीने 136 धावांची शतकी भागी रचत आधी त्यांच्या आव्हानातील हवाच काढली. मग स्वतः षटकार-चौकारांची आतषबाजी करत संघाला विजयपथावर नेले. रोहितच्या रौद्ररूपामुळे 30 षटकांतच 220 धावा केल्यामुळे हिंदुस्थानचा विजय निश्चित झाला होता. पुढे श्रेयस अय्यर (44) आणि अक्षर पटेलच्या (41) खेळीमुळे हिंदुस्थानच्या सहजसुंदर विजयावर 44.3 षटकांतच शिक्कामोर्तब झाले.
त्याआधी इंग्लंडला फिल सॉल्ट (26)आणि बेन डकेटने (65) आक्रमक सुरुवात करून दिली. डकेटनंतर ज्यो रुटने 72 चेंडूंत 69 धावांची संयमी खेळी करत आपली कामगिरी चोख बजावली. पुढे हॅरी ब्रुक (31), जॉस बटलर (34) आणि लियाम लिव्हिंगस्टनने (41) उपयुक्त खेळय़ा करत इंग्लंडला 300 धावांचा टप्पा गाठून दिला. हिंदुस्थानच्या रवींद्र जाडेजाने पुन्हा एकदा आपल्या फिरकीची जादू दाखवताना 35 धावांत 3 विकेट टिपले. तर शमी, राणा, पंडय़ा, चक्रवर्ती यांनी प्रत्येकी एक फलंदाज बाद केला.