
शतकांच्या भुकेला असलेल्या शुभमन गिलने सलग दुसरे आणि सातवे एकदिवसीय शतक झळकावत हिंदुस्थानला चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सलामीलाच बांगलादेशविरुद्ध दणदणीत विजय मिळवून दिला. बांगलादेशच्या 229 धावांचा पाठलाग करताना हिंदुस्थानने 21 चेंडू आणि 6 विकेट राखून सहज विजय नोंदविला.
बांगलादेशच्या 229 धावांचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्मा व शुभमन गिल यांनी 69 धावांची सलामी देत हिंदुस्थानला खणखणीत सुरुवात करून दिली. 37 चेंडूंत 7 चौकार ठोकणाऱया रोहितला तस्कीन अहमदने रिशादकरवी झेलबाद करताच बांगलादेशने सुटकेचा निःश्वास सोडला. त्यानंतर विराट कोहली (22), श्रेयस अय्यर (15) व अक्षर पटेल (8) या मधल्या फळीतील फलंदाज लवकर बाद झाल्याने हिंदुस्थानचा विजय लांबला. सलामीवीर गिलने एका बाजूने शांतपणे फलंदाजी करीत 129 चेंडूंत 9 चौकार व 2 षटकारांसह नाबाद 101 धावांची खेळी सजविली. त्याने गेल्या सामन्यात इंग्लंडविरुद्धही शतक ठोकले होते. षटकार खेचून सामना संपविणाऱ्या लोकेश राहुलने 47 चेंडूंत नाबाद 41 धावा ठोकल्या.
दरम्यान, नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने 49.4 षटकांत 228 अशी असुरक्षित धावसंख्या उभारली. मोहम्मद शमीने पहिल्याच षटकात सौम्या सरकारला भोपळाही फोडू न देता यष्टीमागे राहुलकरवी झेलबाद करून टीम इंडियाला सनसनाटी सुरुवात करून दिली. त्याच्या जागेवर आलेला कर्णधार नजमल होसेन शांतो हादेखील खाते न उघडताच तंबूत परतला. हर्षित राणाने त्याला कोहलीकरवी झेलबाद करून बांगलादेशला दुसरा हादरा दिला. मग शमीने आलेल्या मेहदी हसन सिराजला 5 धावेवर गिलकरवी झेलबाद करून बांगलादेशची 3 बाद 26 अशी दुर्दशा केली.
रोहितमुळे हुकली हॅटट्रिक
पहिला चेंडू निर्धाव टाकल्यानंतर दुसऱया चेंडूवर तन्झीद हसनला (25) यष्टीमागे झेलबाद केले. पुढच्या चेंडूवर आलेल्या मुशफिकरला शून्यावर झेल देण्यास भाग पाडले. आता अक्षर पटेलच्या हॅटट्रिक चेंडूवर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. त्याने टाकलेला चेंडू जाकेर अलीच्या बॅटला चाटून पहिल्या स्लिपमध्ये उडाला, मात्र रोहितने घाईत हा सोपा झेल सोडला अन् अक्षरची हॅटट्रिक हुकली.
मोहम्मद शमीचा विश्वविक्रम
संघात पुनरागमन करणाऱया शमीने पहिल्याच सामन्यात बांगलादेशचे पाच फलंदाज बाद करीत अनेक विक्रमांना गवसणी घातली. पहिले तीन विकेट टिपताच शमीने एकदिवसीय क्रिकेटमधीलं 200 विकेटचा टप्पा पूर्ण केला. याचबरोबर एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वात कमी चेंडूंत 200 विकेट टिपणारा तो गोलंदाज बनलाय. शमीने याबाबतीत मिचेल स्टार्कचा विश्वविक्रम मोडला.