IND vs BAN – रवी खेळला अन् रवीही लढला, अश्विनचे झुंजार शतक, जाडेजासह 195 धावांची अभेद्य भागीदारी

बांगलादेश हा कसोटी क्रिकेटमध्येही एक चांगला देश म्हणून नावारूपाला येतोय. पहिल्याच दिवशी बांगलादेशी संघाने त्याची झलक दिली. त्यांच्या खेळाने हिंदुस्थानी संघात जोरदार धमाका झाला आणि हिंदुस्थानही हादरला. 144 धावांवरच 6 जागतिक दर्जाचे फलंदाज बाद झाले. ही अवस्था पाहावत नव्हती. पाकिस्तानात जो खेळ बांगलादेशी गोलंदाजांनी दाखवला होता त्याची झलक पहिल्या तासातच दिसली. पण आज एक सोडून दोन-दोन रवी हिंदुस्थानी संघाच्या मदतीसाठी धावून आले. बांगलादेशी आक्रमणापुढे रवीच खेळला, रवीच झुंजला आणि अखेर रवीच लढले. रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जाडेजा हे दोन्ही रवी आज चेन्नईत तळपले आणि बांगलादेशने केलेल्या हल्ल्याला 195 धावांच्या अभेद्य शतकी भागीने चोख प्रत्युत्तर दिले. अश्विनने आपले (102) सहावे शतक झळकवले आहे, तर जाडेजा (86) आपल्या पाचव्या शतकाच्या उंबरठय़ावर आहे.

101 वी कसोटी संस्मरणीय

अश्विनसाठी 101 वी कसोटी संस्मरणीय ठरली. त्याला शंभराव्या कसोटीत शतक ठोकता आले नाही, पण त्याने 101 व्या कसोटीत शतक ठोकले. शंभराव्या कसोटीत का@लिन काऊड्रे, जावेद मियांदाद, गॉर्डन ग्रीनिज, अॅलेक स्टुअर्ट, इंझमाम-उल-हक, रिकी पॉण्टिंग, ग्रॅम स्मिथ, हाशिम अमला, ज्यो रुट आणि डेव्हिड वॉर्नर यांनी शतके ठोकली आहेत. तसेच एकाच मैदानात शतक आणि पाचपेक्षा अधिक विकेट घेणाऱया खेळाडूंमध्ये अश्विन आता पहिल्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत गॅरी सोबर्स, कपिलदेव, इयान बोथम, ख्रिस केर्न्स या अष्टपैलूंनी एकाच मैदानात दोन शतके आणि दोन वेळा पाच विकेट टिपलेत. पण अश्विनने चेन्नईत आधीच चार वेळा पाच विकेट टिपलेत आणि आज दुसरे शतकही ठोकले. त्यामुळे तो चेन्नईत दोन शतके आणि चार वेळा पाच विकेट टिपत अष्टपैलूंच्या यादीत अव्वल स्थानावर आहे.

हसनचा तिहेरी धक्का

आजचा दिवस हसन मेहमूद, रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जाडेजाने गाजवला. सुरुवात हसनने केली. सलग तीन षटकांत त्याने रोहित शर्मा (6), शुबमन गिल (0) आणि विराट कोहली (6) या स्टार फलंदाजांना बाद करत हिंदुस्थानी संघाला हादरवले. हा तिहेरी धक्का जबरदस्त होता. पहिल्या तासातच हिंदुस्थानची 3 बाद 34 अशी केविलवाणी अवस्था झाल्यानंतर बांगलादेशची देहबोली भन्नाट होती. पण यशस्वी जैसवाल आणि 632 दिवसांनंतर पुनरागमन करणाऱया ऋषभ पंतने दुसऱया तासात खणखणीत चौकारांची आतषबाजी करत पहिल्या तासाचे हादरे विसरायला भाग पाडले. उपाहाराला खेळ 88 धावांवर थांबला, पण उपाहारानंतर पंत बाद झाला. हसन मेहमूदनेच त्याचा अडसर दूर केला. जैसवाल-पंतने 62 धावांनी भागी केली होती. मग जैसवाल-राहुलची जोडी जमली. दोघांनी 48 धावांची भर घातली. खेळ चांगलाच रंगत होता, तेव्हाच नवोदित नाहिद राणाने सकाळपासून हिंदुस्थानला सावरणाऱया जैसवालची विकेट घेतली. जैसवालने 56 धावा केल्या, पुढच्याच षटकात हसन मिराझने राहुलला बाद केले. 144 धावांवर सलग दोन धक्के. साडेतीन तासांतच हिंदुस्थानने 6 फलंदाज गमावले आणि बांगलादेशने कसोटीवर आपली पकड मजबूत केली.

ढगाळ वातावरणात सूर्य तळपला

हिंदुस्थानी डावावर काळे ढग पसरले होते. तेव्हा ढगाळ वातावरणातून हिंदुस्थानी संघाला आशेचे किरण दाखवण्यासाठी मैदानात अवतरलेल्या रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जाडेजाने कमाल केली. दोघांनी केवळ संघाला सावरलेच नाही, तर पहिल्या दोन सत्रातील सारे अपयशही कडक फटकेबाजीने धुऊन काढले. त्यांनी बांगलादेशी गोलंदाजीची अशी पिसे काढली की, त्यांनी पहिल्या सत्रात केलेली कामगिरीही वाहून गेली. रवी तळपण्यापूर्वी हिंदुस्थानच्या 42.2 षटकांत 144 धावा झाल्या होत्या तर या रवींच्या फटकेबाजीने बांगलादेशी गोलंदाजी अक्षरशः होरपळली. दोघांनी 37.4 षटकांत चक्क 195 धावा पह्डून काढल्या. यात 20 चौकार आणि 4 षटकारांचाही समावेश आहे.