गुरुवारपासून बांगलादेशविरुद्ध पहिला कसोटी सामना सुरू होतोय आणि दुसरीकडे दुलीप ट्रॉफीचीही अंतिम लढाई सुरू होतेय. या स्पर्धेत चमकणाऱ्या खेळाडूचा बांगलादेशविरुद्ध दुसऱ्या कसोटीसाठी विचार केला जाण्याची शक्यता असल्यामुळे हिंदुस्थानी संघात स्थान निर्माण करण्यात कोण यशस्वी होतेय ते दिसेलच, पण त्याचसोबत दुलीप ट्रॉफी जिंकण्याची हिंदुस्थान ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ या तिन्ही संघांना समान संधी असून कोणता संघ ट्रॉफीवर आपला कब्जा करतोय ते येत्या चार दिवसांत स्पष्ट होईल.
शनिवारपासून अनंतपूर येथे हिंदुस्थान ‘ब’ आणि ‘ड’ यांच्यात सामना रंगणार आहे, तर दुसरा सामना हिंदुस्थान ‘अ’ आणि ‘क’ यांच्यात दुसरा सामना खेळला जाईल. हिंदुस्थान संघात पुनरागमनासाठी धडपडत असलेल्या श्रेयस अय्यरचा ‘ड’ संघ पहिले दोन्ही सामने हरला असल्यामुळे ते जेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत, मात्र या सामन्यात दमदार खेळ करून श्रेयस निवड समितीचे लक्ष वेधू शकतो. ट्रॉफीच्या शर्यतीत ऋतुराज गायकवाडचा हिंदुस्थान ‘क’ 9 गुणांसह अव्वल स्थानी आहे तर त्यांची गाठ सहा गुणांसह तिसऱ्या स्थानावर असलेल्या ‘अ’ संघाशी पडणार आहे. हिंदुस्थान ‘क’ संघाने निर्णायक विजय मिळवला तर दुलीप ट्रॉफीवर त्यांचे नाव असेल. मग दुसऱ्या सामन्यात हिंदुस्थान ‘ब’ ने हिंदुस्थान ‘ड’ ला पराभूत केले तरी ते दुलीप ट्रॉफीपासून दूरच राहतील. मात्र सामना अनिर्णीत राहिल्यास पहिल्या डावातील आघाडी महत्त्वाची ठरणार आहे.
मुशीर खानवर लक्ष
रणजी मोसमाच्या शेवटी जबरदस्त खेळी आणि आता दुलीप ट्रॉफीतही धावांचा पाऊस पाडणाऱ्या मुंबईकर मुशीर खानने निवड समिती सदस्यांचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे. मुंबईला रणजी जेतेपद जिंपून देण्यात सिंहाचा वाटा उचलणारा मुनीर हा सरफराज खानचा धाकटा भाऊ असून तो केवळ 19 वर्षांचाच आहे. त्याने स्पर्धेच्या पहिल्याच डावात 181 धावांची मॅचविनिंग खेळी केली आहे. मात्र त्यानंतर 0 आणि 1 अशा अपयशी खेळीही त्याच्या बॅटमधून निघाल्या आहेत. उद्या मुशीरच्या बॅटमधून पुन्हा एकदा शतक बरसले तर तो हिंदुस्थानी कसोटी संघातही दिसू शकतो. बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी त्याच्या नावाची चर्चा होणे अवघड असले तरी न्यूझीलंडविरुद्ध तो हिंदुस्थानी कसोटी संघात नक्कीच दिसू शकतो. मुशीरसह रिकी भुई, रिंपू सिंग यांच्याबरोबर 11 विकेट टिपणारा अंशुल कंबोज, मुकेश कुमार (10 विकेट) यांच्याही कामगिरीवर निवड समितीचे बारीक लक्ष असेल.
सूर्यकुमार यादव पुन्हा संघात
हिंदुस्थानी कसोटी संघात खेळण्याचे स्वप्न पाहत असलेला सूर्यकुमार यादव आपल्या दुखापतीमुळे दुसऱ्या सामन्याला मुकला होता. मात्र आता त्याच्या अंगठ्याची दुखापत बरी झाली असून तो हिंदुस्थान ‘ब’ संघात सरफराज खानची जागा घेईल. या संघाचे नेतृत्व अभिमन्यू ईश्वरनच्या हातात सोपविण्यात आले आहे. पांढऱ्या चेंडूच्या खेळात आपला दरारा निर्माण करणाऱ्या सूर्याला कसोटी क्रिकेटमध्येही आपले स्थान निर्माण करायचे आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने कसोटी पदार्पण केले, पण त्यानंतर तब्बल दीड वर्ष तो संघाबाहरेच घुटमळतोय.
632 दिवसांनंतर तो परततोय
ऋषभ पंत आपली शेवटची कसोटी बांगलादेशविरुद्ध 2022 मध्येच खेळला होता. त्यानंतर झालेल्या कार अपघातात गंभीर जखमी झालेल्या पंतने तब्बल दीड वर्षानंतर क्रिकेटमध्ये पुनरागमन केले असले तरी तो कसोटी क्रिकेटमध्ये 632 दिवसांनंतर परततोय. अपघातानंतर त्याच्या पुनरागमनाबाबत साऱ्यांच्याच मनात साशंकता होती, पण त्याने एकेक करत सर्वच क्रिकेट फॉरमॅटमध्ये दमदार पुनरागमन केले आहे आणि आता तो कसोटीतही त्याच धडाकेबाज पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे.
योगायोगाने पंत आपला शेवटचा कसोटी सामना बांगलादेशविरुद्ध जुलै 2022 मध्ये खेळला होता. आता तो कसोटी पुनरागमन करतोय. गेल्या दोन वर्षांत संघात अनेक बदल झाले असले तरी पंतचा खेळ पाहता तो आजही हिंदुस्थानी संघाची पहिली पसंत बनला आहे. नवोदित यष्टिरक्षक ध्रुव जुरेलने पदार्पणातच आपली चमक दाखवली आहे. मात्र उद्या जुरेलऐवजी पंत संघात खेळणार आहे. काहींना हे पटणार नाही. पण संघाचे विद्यमान प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी पंतची गरज संघाला पटवून दिली आहे. तो एक फलंदाज म्हणून विध्वंसक आहे. तो फलंदाजीत काहीही करू शकतो. त्याने जगात सर्वत्र धावा केल्या आहेत. तो मॅचविनर खेळाडू आहे. त्याची उपस्थितीही संघासाठी खूप महत्त्वाची आहे.