शमीच्या बाबतीत रिस्क नको – रोहित शर्मा

देशांतर्गत क्रिकेट खेळत असलेल्या मोहम्मद शमीचे ऑस्ट्रेलियातील आगमन बॉक्सिंग डे कसोटीतही होणार नसल्याचे कर्णधार रोहित शर्माने स्पष्ट केले. हिंदुस्थानी संघाला शमीची गरज असली तरी त्याच्याबाबतीत संघव्यवस्थापन कोणताही धोका पत्करू इच्छित नसल्याचे त्याने सांगितले. जोपर्यंत शमीच्या फिटनेसबाबत संघ व्यवस्थापनाला पूर्णपणे खात्री होत नाही तोपर्यंत ते कोणतीही जोखीम घेणार नाहीय. 34 वर्षीय मोहम्मद शमी टाचेवर झालेल्या शस्त्रक्रियेपासून वर्षभर संघाबाहेर आहे. सध्या त्याची 21 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विजय हजारे करंडकासाठी बंगाल संघात निवड करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात तो रणजी स्पर्धेत मध्य प्रदेशविरुद्ध खेळला होता. तसेच नुकत्याच झालेल्या सय्यदमुश्ताक अली करंडकातही तो काही सामने खेळला होता. आज कसोटीनंतर पत्रकार परिषदेत रोहित शर्माला शमीबाबत छेडले असता म्हणाला, एनसीएने शमीच्या फिटनेसबाबत हिरवा कंदील दाखवल्यास तो कोणत्याही क्षणी संघात असेल.