रोहित की संघहित ? सिडनी कसोटीत अंतिम संघनिवडीबाबत सस्पेन्स

सिडनी कसोटीत संघ व्यवस्थापन कर्णधार रोहित शर्माला प्राधान्य देणार की संघहित पाहणार? हिंदुस्थानी संघाच्या अंतिम संघाबाबत सस्पेन्स कायम असल्यामुळे कोणता निर्णय घेतला जाणार याबाबत दुमत असल्याचे समोर आले आहे. हिंदुस्थानला बॉर्डर-गावसकर (बॉगाक) करंडक मालिकेतील सिडनी कसोटी जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याची शेवटची संधी उपलब्ध आहे. तसेच सिडनी कसोटी जिंकल्यावरच हिंदुस्थानचे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम लढतीत स्थान मिळवण्याच्या शक्यता कायम राहणार आहेत. कसोटी हरलो किंवा अनिर्णित राहिली तर लॉर्ड्सवर डब्ल्यूटीसीच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका खेळणार यावर शिक्कामोर्तब होईल.

मेलबर्न कसोटीतील पराभव हिंदुस्थानी खेळाडूंच्या जिव्हारी लागला आहे. शेवटच्या दिवशी हिंदुस्थानला कसोटी अनिर्णितावस्थेत राखण्याची संधी होती, पण अवघ्या 34 धावांत हिंदुस्थानच्या सात फलंदाजांनी आपली विकेट गमावल्यामुळे ऑस्ट्रेलियाने विजय मिळवत मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. या कसोटीत पुन्हा एकदा हिंदुस्थानच्या आघाडीच्या दिग्गज फलंदाजांनी घोर निराशा केल्यामुळे अवघ्या हिंदुस्थानात त्यांच्याबद्दल संतापाची लाट उसळली आहे. परिणामतः संघ व्यवस्थापन सिडनीत बदल करणार की त्याच संघाला कायम ठेवणार, हे निश्चित कळू शकलेले नाही.

विराटला आणखी एक हंगाम मिळू शकतो

रोहितचा खेळ पाहता तो कसोटीतून निवृत्त होणार हे जवळजवळ निश्चित झाले आहे. तसेही रोहितची कसोटी कारकीर्द फार कधी बहरलीच नव्हती. त्यामुळे सिडनी कसोटी त्याची अखेरची कसोटी ठरण्याची शक्यता असली तरी विराट कोहलीबाबत हा निर्णय होण्याची शक्यता कमी आहे. विराटचा फिटनेस आणि मार्गदर्शक म्हणून संघासोबतचा त्याचा प्रवास हिंदुस्थानी संघासाठी आजही महत्त्वाचा मानला जात आहे. तसे विराटच्या कसोटी क्रिकेटचा खेळ गेल्या पाच वर्षांत खूपच खालावला असला तरी त्याला आणखी एक हंगाम आपला खेळ उंचावण्यासाठी दिला जाऊ शकतो, अशी शक्यता ज्येष्ठ क्रिकेटपटूंनीच वर्तवली आहे. तसेच विराटलाही त्याच्या कसोटी कारकीर्दीबाबत निवड समिती चर्चा करून निर्णय घेऊ शकते. या मालिकेतील विराटचा खालावलेला खेळ पाहिल्यानंतर त्याला सन्मानाने निवृत्त होण्याची संधी निवड समितीकडून दिली जाऊ शकते. विराटमध्ये असलेली लढण्याची वृत्तीच त्याची कारकीर्द आणखी किती काळ लांबते, हे दाखवून देऊ शकते.

शुबमन गिल परतणार

मेलबर्न कसोटीत हिंदुस्थानची फलंदाजी बळकट करण्यासाठी नितीशकुमार रेड्डीही खेळला आणि वॉशिंग्टन सुंदरलाही कायम ठेवण्यात आले. मात्र सिडनीत शुबमन गिल पुनरागमन करणार हे स्पष्ट आहे. गिलचे संघातील स्थान नेहमीप्रमाणेच ठेवले जाईल आणि सलामीला जैसवाल आणि राहुललाच पाचारण केले जाणार, याचे संकेतही मिळत आहेत. आता आघाडीला गिल आल्यानंतर कुणाला वगळावे, हा मोठा प्रश्न संघव्यवस्थापनापुढे उभा राहिला आहे. त्यामुळे वॉशिंग्टन सुंदर किंवा रवींद्र जाडेजापैकी एकाला विश्रांती दिली जाऊ शकते. तसेच आकाशदीपला विश्रांती देत हर्षित राणा किंवा प्रसिध कृष्णालाही आजमावण्याचा निर्णय निवड समिती घेऊ शकते. मेलबर्नवर तीन वेगवान गोलंदाजांसह दोन फिरकीवीर खेळविले जातात. हिंदुस्थानही त्याच फॉरमॅटमध्ये संघ निवडतो की आपली फलंदाजी मजबूत करण्यासाठी एका फिरकीवीराला विश्रांती देतो, याचा निर्णय कसोटीपूर्वीच होईल.

रोहित शर्माची निरोपाची कसोटी?

मेलबर्न पराभवामुळे संघात बदलाची सर्वांनाच अपेक्षा आहे. पण संघात केवळ एक बदल करून संघाची कामगिरी फार उंचावेल, अशी स्थिती नसल्याचेही मत समोर आले आहे. त्यामुळे पूर्ण मालिकेत अपयशी ठरलेल्या कर्णधार रोहित शर्माला अखेरची संधी देत हिंदुस्थानी संघात पुन्हा मैदानात उतरवण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे सूत्रांकडून कळले आहे. रोहितचा खेळ पाहता त्याला संघातून वगळावे, असेच मत असले तरी निरोपाची कसोटी म्हणून रोहित पुन्हा कर्णधार म्हणून संघात दिसू शकतो. मात्र त्याला सलामीला न खेळवता पुन्हा मधल्या फळीत खेळविण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. नेहमीच संघहिताला प्राधान्य देणारा रोहित आपला फॉर्म पाहून सिडनी कसोटीत काय भूमिका घेतो याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

तनुष कोटियन पर्यटकच राहणार?

रविचंद्रन अश्विनच्या तडकाफडकी निवृत्तीनंतर संघ व्यवस्थापनाने मुंबईकर तनुष कोटियनला तत्काळ मेलबर्नला बोलावून घेतले. एमसीजीवर त्याला खेळविण्याची शक्यता फार कमीच होती आणि झालेही तसेच. आता सिडनी कसोटी सुरू होत असून या कसोटीतही त्याला अंतिम अकरा खेळाडूंमध्ये खेळविण्याची शक्यता कमीच आहे. संघात असलेल्या दोन फिरकीवीरांपैकी एकाची निवड करण्याची वेळ संघव्यवस्थापनावर आल्यामुळे तनुषचे पदार्पण लांबणीवर पडण्याचीच शक्यता आहे. पण सध्या द्विधा मनःस्थितीत असलेले संघ व्यवस्थापन कसोटीपूर्वी काहीही करू शकते. याचा अनुभव गेल्या काही सामन्यांत आला आहे.

ईश्वरन, सरफराज बाकावरच बसणार

ऑस्ट्रेलियाच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत हिंदुस्थानी संघात निवडण्यात आलेल्या सर्व खेळाडूंना संधी मिळण्याची अपेक्षा होती. पण संघात असलेल्या अभिमन्यू ईश्वरन आणि सरफराज खान या फलंदाजांना सिडनीतही निवडण्याची शक्यता नसल्यामुळे ते बाकावरच बसणार हे निश्चित आहे. तसेच गोलंदाज म्हणून प्रसिध कृष्णा हा एकमेव गोलंदाज आहे, ज्याला एकाही कसोटीत अद्याप संधी लाभू शकलेली नाही.

ऑस्ट्रेलियाच संघ तोच

ऍडलेड आणि मेलबर्न कसोटीत जोरदार कामगिरी करणारा ऑस्ट्रलियन संघ सिडनीतही कायम असणार. मेलबर्न विजयामुळे ऑस्ट्रेलियन संघाचे मनोधैर्य उंचावलेले आहे आणि त्यांच्या संघाची कामगिरी जबरदस्त झाल्यामुळे तेच अकरा खेळाडू सिडनीतही कायम ठेवण्यात आले आहे. मेलबर्नमध्ये मॅकस्विनीच्या जागी कॉन्स्टस आणि हेझलवूडच्या जागी बोलॅण्डला खेळविण्यात आले होते आणि या दोघांनीही दमदार खेळ करत सिडनीतही आपले स्थान पक्के केले आहे.
सिडनी कसोटी संभाव्य संघ

  • हिंदुस्थान ः यशस्वी जैसवाल, के. एल. राहुल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), रोहित शर्मा (कर्णधार), रवींद्र जाडेजा/वॉशिंग्टन सुंदर, नितीशकुमार रेड्डी, आकाश दीप/हर्षित राणा, जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज.
  • ऑस्ट्रेलिया ः उस्मान ख्वाजा, सॅम कोनस्टास, मार्नस लाबुशन, स्टीव्हन स्मिथ, ट्रव्हिस हेड, मिचेल मार्श, ऍलेक्स कॅरी (यष्टिरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लायन, स्कॉट बोलॅण्ड.