सलग चारवेळा बॉर्डर-गावसकर करंडक (बॉगाक) जिंकून कसोटी क्रिकेट गाजवणाऱया हिंदुस्थानने ऑस्ट्रेलियाचा 4-0 ने धुव्वा उडवत पाचव्यांदा ‘बॉगाक’ जिंकण्याचा कारनामा करण्याचे स्वप्न उराशी बाळगत ऑस्ट्रेलियन भूमीवर पाऊल ठेवले होते. मात्र रोहित शर्मा, विराट कोहलीसारख्या दिग्गज आणि महान खेळाडूंनी फलंदाजीत माती खाल्ल्यामुळे तसेच सळसळत्या रक्ताच्या खेळाडूंच्या थंड कामगिरीमुळे हिंदुस्थान सिडनीतही फेल ठरला. परिणामतः सलग तिसऱयांदा जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम फेरीत खेळण्याचे स्वप्नही उद्ध्वस्त झाले. आधी न्यूझीलंड आणि आता ऑस्ट्रेलियाविरुद्धचा हिंदुस्थानचा तीन कसोटी पराभवांचा हारनामा पाहून जगभरातील कोट्यवधी हिंदुस्थानी क्रिकेटप्रेमींच्या भावनाही दुखावल्या. हिंदुस्थानचे 162 धावांचे माफक आव्हान ऑस्ट्रेलियाने 4 विकेट गमावत सहजगत्या गाठले आणि पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेचा बॉर्डर-गावसकर करंडक 3-1 असा जिंकला. तब्बल चार मालिका पराभव आणि दहा वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाने पुन्हा एकदा हा करंडक आपल्या देशात खेचून आणला.
शनिवारी ऋषभ पंतच्या झंझावाताने हिंदुस्थानी संघात चैतन्य निर्माण केले होते. शनिवारी 6 बाद 141 अशा स्थितीत असलेल्या हिंदुस्थानच्या तळदाजांकडून झुंजार खेळाची अपेक्षा होती. सिडनी कसोटी जिंकून सलग पाचव्यांदा ‘बॉगाक’ आपल्याकडे राखण्याचा पराक्रम करण्याची संधीही हिंदुस्थानला संघाला होती. पण शनिवारच्या नाबाद रवींद्र जाडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर या अष्टपैलूंच्या जोडीनेही दिग्गजांप्रमाणे घोर निराशा केली. हिंदुस्थानच्या धावसंख्येत केवळ 6 धावांची भर घालून रवींद्र जाडेजाने आपली विकेट पॅट कमिन्सला बहाल केली. त्यानंतर हिंदुस्थानचा डाव संपवायला स्कॉट बोलॅण्डला फार भेदक मारा करावा लागला नाही. कमिन्सने वॉशिंग्टनची विकेट उडवली तर बोलॅण्डने तीन चेंडूंत सिराज आणि बुमराला बाद करून हिंदुस्थानच्या डावावर 157 धावांतच पूर्णविराम लावला. आज हिंदुस्थानने चार फलंदाज गमावत फक्त 16 धावांची भर घातली. आघाडीवीरांनी निराश केल्यानंतर मधल्या फळीनेही संघाला संकटातून बाहेर काढण्यासाठी जराही संघर्ष केला नाही. पहिल्या डावात मिळवलेल्या 4 धावांच्या आघाडीमुळे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 162 धावांचे लक्ष्य गाठायचे होते.
बुमराच मालिकावीर
हिंदुस्थानचा हंगामी कर्णधार जसप्रीत बुमरा सिडनी कसोटीत केवळ दहा षटकेच गोलंदाजी करू शकला. दुसऱ्या डावात तो मैदानात उतरू शकला नाही. तरीही त्याने मालिकेत 32 विकेट टिपत सर्वोत्तम आणि भन्नाट कामगिरी केली. याच कामगिरीच्या जोरावर त्याला ‘मालिकावीर’ पुरस्काराचा मान मिळाला. एकटय़ा बुमराचा अपवाद वगळता हिंदुस्थानचा एकही फलंदाज किंवा गोलंदाज सातत्यपूर्ण कामगिरी करू शकला नाही. याच निराशाजनक कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियापेक्षा वरचढ असलेल्या हिंदुस्थानी संघाला पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत 3-1 ने लाजीरवाणा पराभव सहन करावा लागला. हिंदुस्थानला गेल्या आठपैकी सहा कसोटी सामन्यांत पराभवाची नामुष्की सहन करावी लागली. फक्त एकाच कसोटीत विजय नोंदविता आला आणि मेलबर्न कसोटी अनिर्णितावस्थेत सुटली. या कसोटीत दहा विकेट टिपणारा स्कॉट बोलॅण्ड विजयाचा शिल्पकार ठरला.
सलग 21 षटके सिराज-प्रसिधचीच गोलंदाजी
उपाहारानंतर नेहमीच सामन्याला कलाटणी मिळते. पण ट्रव्हिस हेड आणि उस्मान ख्वाजाने पुन्हा फटकेबाजीला सुरुवात करत सामन्यावर वर्चस्व मिळवायला सुरुवात केली. ऑस्ट्रेलियाने शंभरी ओलांडली होती तेव्हा प्रसिधने ख्वाजाच्या फटकेबाजीवर आवर घालण्यात यश मिळवले. ख्वाजा 41 धावांवर बाद झाल्यानंतर हिंदुस्थानला सामन्यात पुन्हा येण्याची संधी निर्माण झाली होती. बुमरा नसल्यामुळे सिराज-प्रसिध नॉनस्टॉप गोलंदाजी करत होते. दोघांनी सलग 21 षटके गोलंदाजी केली. पहिले चार विकेटही त्यांनीच काढले. अखेर 22 व्या षटकात नितीशकुमार रेड्डीच्या हातात चेंडू देण्यात आला. पण रेड्डीच्या गोलंदाजीत कसलीही धार जाणवली नाही. मग पुन्हा तेच दोघे गोलंदाजी करू लागले. पण हेड आणि पदार्पणवीर ब्यू बेवस्टरने वेगवान धावांचा धडाका कायम राखत 27 व्या षटकात सुंदरला दोन चौकार ठोकत तब्बल दशकानंतर ऑस्ट्रेलियाला पुन्हा ‘बॉगाक’ मिळवून देण्याचा कारनामा केला. हिंदुस्थानने दुसऱया डावात 27 षटके गोलंदाजी केली. त्यापैकी 24 षटके सिराज-प्रसिधनेच फेकली.
दुसरा धक्का बुमराच्या रूपाने
हिंदुस्थानचा डाव अपेक्षेप्रमाणे 157 धावांत आटोपल्यानंतर ऑस्ट्रेलियाला केवळ जसप्रीत बुमराची भीती होती. शनिवारी बुमराच्या अनुपस्थितीत प्रसिध आणि सिराजने ऑस्ट्रेलियन डावाला 181 धावांत गुंडाळण्याची किमया साधली होती. त्यामुळे दुसऱया डावात बुमराच्या गोलंदाजीवर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. पण हिंदुस्थानचे नेतृत्व सांभाळत असलेला बुमरा गोलंदाजीसाठी मैदानावर उतरलाच नाही. हा हिंदुस्थानी संघासाठी सकाळी सकाळी फार मोठा मानसिक धक्का होता. तेथील हिंदुस्थानने हार मानली होती.
प्रसिधने जान आणली
बुमराशिवाय हिंदुस्थानी गोलंदाजी कल्पनाच करणेच अशक्य होते. पण सकाळीच तो धक्का बसल्यानंतर मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णाने ऑस्ट्रेलियन फलंदाजांना गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. सॅम कॉन्सटसने मैदानात उतरताच हल्लाबोल करत आपण मालिका जिंकण्यासाठी खेळत असल्याचे दाखवून दिले. 3.5 षटकांत 39 धावा लागल्या असताना कॉन्सटसची विकेट सिराजने काढत संघाला लढण्याची शक्ती दिली. पुढे प्रसिधने आपल्या सलग षटकांत आधी मार्नस लाबुशेन (6) आणि मग स्टिव्ह स्मिथ (4) यांच्या विकेट काढत ऑस्ट्रेलियाचे 3 बाद 58 अशी अवस्था करत संघात जान आणली. या दुहेरी धक्क्यानंतर सामन्यात काहीही घडू शकते, असे चित्र सिराज-प्रसिधने उभे केले होते. उपाहाराला खेळ थांबला तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या 3 बाद 71 अशा धावा होत्या.