सिडनी कसोटीला रंगतदार वळण; टीम इंडियाचं बेझबॉल, ऑस्ट्रेलियाचं कमबॅक, तिसरा दिवस निर्णायक

हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया संघात सुरू असलेली सिडनी कसोटीला रंगतदार वळण मिळाले आहे. दुसरा दिवस संपेपर्यंत हिंदुस्थानने दुसऱ्या डावात 6 विकेट गमावून 141 धावा केल्या. रवींद्र जडेजा (नाबाद 8) आणि वॉशिंग्टन सुंदर (नाबाद 6) ही जोडी मैदानात आहे. तिसऱ्या दिवशी या दोघांवर हिंदुस्थानची आघाडी 200 पार नेण्याची जबाबदारी आहे. खेळपट्टीचा नूर पाहता तिसर्‍या दिवशीच सिडनी कसोटीचा निकाल लागण्याची शक्यता आहे.

दुसऱ्या दिवशी हिंदुस्थानने ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 181 धावांमध्ये गुंडाळला. ऑस्ट्रेलियाकडून पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या वेबस्टरने अर्धशतकीय (57) खेळी केली. हिंदुस्थानकडून मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णाने प्रत्येकी 3 विकेट्स, तर जसप्रीत बुमराह आणि नितीश रेड्डीने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

हिंदुस्थानला पहिल्या डावात 4 धावांची आघाडी मिळाली. ही आघाडी वाढवण्यासाठी हिंदुस्थानच्या फलंदाजांनी बेझबॉल तंत्र वापरले. सुरुवातीला हा प्रयोग यशस्वी ठरला. मात्र त्यानंतर एकामागोमाग एक विकेट गेल्या आणि हिंदुस्थानची स्थिती बिनबाद 42 वरून 4 बाद 78 अशी झाली.

मात्र त्यानंतर ऋषभ पंतने तुफान फटकेबाजी करत संघाला दबावातून बाहेर काढले. त्याने 33 चेंडूत 61 धावा चोपल्या. 4 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने त्याने ही खेळी सजवली. मात्र ड्रिंक्स ब्रेकनंतर तो लगेच बाद झाला. नितीश रेड्डीही आल्या पावली माघारी परतला. आता जडेजा आणि सुंदर ही जोडी मैदानात आहे.

Jasprit Bumrah – जसप्रीत बुमराहनं सामना सुरू असताना मैदान सोडलं; कोहली कर्णधार, नक्की झालं काय?

70 वर्षात दुसऱ्यांदाच असं घडलं

सिडनी कसोटीत दोन्ही संघ पहिल्या डावात 200 धावांचा आकडाही पार करू शकले नाहीत. सिडनी क्रिकेट मैदानावर गेल्या 70 वर्षात फक्त दुसऱ्यांदाच दोन्ही संघ पहिल्या डावात 200 धावांचा टप्पा पार करू शकले नाहीत. याआदी 44 वर्षांपूर्वी असा प्रकार घडला होता. 1979-80 च्या दशकात इंग्लंडचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी सिडनी कसोटीत पहिल्या डावात इंग्लंड 123, तर ऑस्ट्रेलिया 145 धावांमध्ये गारद झाला होता.