चौथ्या दिवशी हिंदुस्थानी संघाने फॉलोऑन टाळल्यामुळे रंगतदार अवस्थेकडे झुकलेली कसोटी सातत्यपूर्ण बॅटिंगमुळे पावसानेच जिंकली. 7 बाद 89 या अनपेक्षित घसरगुंडीनंतर ऑस्ट्रेलियाने आपला दुसरा डाव घोषित करत हिंदुस्थानसमोर विजयासाठी 275 धावांचे जबरदस्त आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करायला हिंदुस्थानची सलामीची जोडी मैदानात उतरली खरी, पण बिनबाद 8 या स्थितीनंतर अंधुक प्रकाशामुळे सामना थांबविण्यात आला. जो पुढे सुरूच होऊ शकला. परिणामतः कसोटीचा थरारक शेवट पावसाचे सावट आणि अंधुक प्रकाशामुळे अनिर्णितावस्थेत संपला. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत तीन कसोटीनंतर 1-1 अशा बरोबरीत उभय संघ आहेत. आता कसोटी मालिकेचे भवितव्य सिडनी आणि मेलबर्न कसोटीवर अवलंबून असेल.
मंगळवारी फॉलोऑन टाळण्याची किमया करणाऱया आकाशदीप आणि जसप्रीत बुमरा यांची जोडी आज फार काळ टिकली नाही. पण पावसाच्या सावटामुळे ढगाळ वातावरणात पाचव्या दिवसाच्या पहिल्या सत्रात फारसा खेळ होऊ शकला नाही. हिंदुस्थानची मंगळवारची नाबाद जोडी मैदानात उतरली, पण 24 चेंडूंचा सामना केल्यानंतर ट्रव्हिस हेडने ही जोडी फोडली. 260 धावांवर हिंदुस्थानचा पहिला डाव आटोपल्यामुळे ऑस्ट्रेलियाला 185 धावांची आघाडी मिळाली होती. आकाशदीपने 31 धावांची झुंजार खेळी केल्यामुळेच हिंदुस्थानला फॉलोऑनची नामुष्की टाळता आली आणि कसोटीचा निकाल बदलला गेला. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने 4 तर स्टार्कने 3 विकेट टिपल्या.
हिंदुस्थानी गोलंदाजांची सनसनाटी सुरुवात
पहिल्या डावात 185 धावांची आघाडी घेतल्यामुळे कसोटीत ऑस्ट्रेलिया आघाडीवर होता. ते धावसंख्येत 100-125 धावांची भर घालून हिंदुस्थानला फलंदाजी देणार होते, मात्र पावसाने कसोटीचा सारा विचकाच केला. ऑस्ट्रेलिया फलंदाजीला आली खरी पण पावसाने स्थिती अंधुक केली होती तरीही ऑस्ट्रेलियाने फलंदाजी केली आणि हिंदुस्थानच्या वेगवान गोलंदाजांनी वातावरणाचा फायदा उठवत वेगाने विकेटही काढल्या. आधीच बराच वेळ वाया गेल्यामुळे ऑस्ट्रेलियाने विकेटची चिंता न करताच धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. यात त्यांनी अवघ्या 18 षटकांच्या खेळात 7 विकेट गमावत 89 धावा केल्या आणि आपला डाव घोषित केला. पॅट कमिन्सने 10 चेंडूंत सर्वाधिक 22 धावा केल्या तर बुमराने 18 धावांत 3 विकेट टिपल्या. पहिल्या डावात 152 धावांची तडाखेबंद खेळी करणारा ट्रव्हिस हेड ‘सामनावीर’ ठरला.
50 षटकांत 275 धावांचे आव्हान
ऑस्ट्रेलियाने केवळ 18 षटकेच फलंदाजी केली. हिंदुस्थानला 60 पेक्षा अधिक षटके फलंदाजी करण्यास त्यांना भाग पाडायचे होते. पण पावसाने त्यांना काहीच करू दिले नाही. यशस्वी जैसवाल आणि के. एल. राहुल सलामीसाठी मैदानात आले खरे. मात्र बिनबाद 8 अशी धावसंख्या असताना पावसाने पुन्हा हजेरी लावली आणि सामना तेथेच थांबविण्यात आला. पंचांनी त्याक्षणी चहापान जाहीर केला, पण त्यानंतर पुन्हा खेळ सुरू होऊ शकला नाही. पावसामुळे उद्भवलेल्या स्थितीमुळे पंचांनी सद्यस्थिती पाहता दोन्ही कर्णधारांच्या संमतीने तेथेच थांबवला आणि एक थरारक सामना ना ऑस्ट्रेलिया जिंकू शकला ना हिंदुस्थान. तो सामना पावसाने जिंकला. या कसोटीत सर्वाधिक काळ किल्ला पावसानेच लढवला. या कसोटीत फक्त सव्वादोन दिवसांचा म्हणजे 216 षटकांचाच खेळ होऊ शकला.