पंच मारण्यात ऑस्ट्रेलियाच यशस्वी, चहापानानंतर हिंदुस्थानचे 7 फलंदाज अवघ्या 34 धावांत गारद

आज दुसऱ्या सत्रात यशस्वी जैसवाल आणि ऋषभ पंतच्या संयमी आणि धीरोदात्त खेळाने कसोटी अनिर्णितावस्थेकडे झुकली होती; पण चहापानानंतर झालेल्या विकेटबाधेने हिंदुस्थानी संघाचा खेळच खल्लास केला. ट्रव्हिस हेडला षटकार ठोकण्यासाठी पंतने उचललेली बॅट आणि त्यानंतर यशस्वी जैसवालची तिसऱ्या पंचांनी काढलेली वादग्रस्त विकेट हिंदुस्थानचा डाव संपवणारी ठरली.

चहापानाला 3 बाद 121 अशा स्थितीत असलेल्या हिंदुस्थानचे 7 फलंदाज अवघ्या 34 धावांत गारद करत ऐतिहासिक बॉक्सिंग डे कसोटीत पाहुण्यांना पंच मारण्यात यजमान ऑस्ट्रेलियाच यशस्वी ठरली आणि त्यांनी बॉर्डर-गावसकर करंडक मालिकेत 2-1 अशी आघाडी घेत जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील आपले स्थानही अधिक भक्कम केले. आजच्या पराभवामुळे हिंदुस्थानचे डब्ल्यूटीसीतील आव्हान कमकुवत झाले आहे.

कालच्या 228 धावसंख्येत सहा धावांची भर घालून ऑस्ट्रेलियाचे शेपूट बाद झाल्याने हिंदुस्थानसमोर 92 षटकांत 340 धावांचे जबर आव्हान उभारले गेले होते. रोहित शर्मा आणि यशस्वी जैसवाल ज्या देहबोलीने मैदानात उतरले ते पाहता हिंदुस्थान विजयासाठी नव्हे, तर सामना अनिर्णित राखण्यासाठीच उतरल्याचे स्पष्ट जाणवत होते. 16 षटकांत अवघ्या 25 धावा काढणारी सलामीची जोडी 17 व्या षटकात फुटली आणि हिंदुस्थानी संघ संकटात सापडला.

रोहित शर्माने पुन्हा एकदा लाजीरवाणा खेळ करत निराशा केली. त्याने सवा तासाच्या संघर्षात केवळ 9 धावा केल्या आणि तो नेहमीप्रमाणे बाद झाला. मग कमिन्सने त्याच षटकात केएल राहुलची विकेट काढत हिंदुस्थानी चाहत्यांमध्ये सन्नाटा पसरवला. मग विराट कोहलीनेही निराशा केली आणि तो पुन्हा एकदा स्टार्कचा बकरा ठरला. 3 बाद 33 अशा दुर्दशेनंतर हिंदुस्थानी संघावर पराभवाची टांगती तलवार लटकू लागली. तेथेच लंच टाईम झाला.

एमसीजीवर विक्रमी उपस्थिती

ऐतिहासिक मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया सामन्याने प्रेक्षकांचा नवा विक्रम प्रस्थापित केला. 1937 साली अ‍ॅशेस मालिकेत बॉक्सिंग डे सहा दिवसांच्या कसोटीला 350534 प्रेक्षकांच्या गर्दीच्या विक्रमाला आजच्या गर्दीने मागे टाकले. पहिल्या चार दिवसांत 87242, 85147, 83073 आणि 43867 अशी उपस्थिती लाभली होती. आज सकाळीच प्रेक्षकांच्या उपस्थितीने 51371 ही संख्या गाठताच 87 वर्षांपूर्वीच्या गर्दीच्या विक्रमाला मागे टाकले गेल्याचे स्क्रीनवर झळकले. लंचनंतर आजची उपस्थिती 60 हजारांच्या पुढे गेल्यामुळे 3 लाख 60 हजारांच्या नवा गर्दीचा विक्रम नोंदवला गेला.

यशस्वी-पंतचा शांत खेळ

नेहमीच फटकेबाजी करण्यात पटाईत असलेल्या यशस्वी जैसवाल आणि ऋषभ पंतने आज आपली फटकेबाजी म्यान करत शांत आणि सावध खेळ करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. दोघांचा हा अनपेक्षित आणि जबाबदारपूर्ण खेळ पाहून सारेच सुखावले होते. दुसऱ्या सत्रात दोघांनी 28 षटकांत केवळ 79 धावाच काढल्या. हा खेळ पाहून सामना अनिर्णितावस्थेकडे झुकला असेच चित्र उभे राहिले होते. पॅट कमिन्स ही जोडी फोडण्यासाठी सारी अस्त्रे आलटून पालटून काढत होता, पण त्याला काही यश लाभत नव्हते.

चहापानाला हिंदुस्थान 3 बाद 112 अशा स्थितीत होता. पण चहातून उत्तेजक द्रव्य प्यायलासारखा पंत चहापानानंतर अखेर भरकटला आणि त्याने हेडच्या चटपटीत चेंडूला षटकार ठोकण्याच्या प्रयत्नात आपली अमूल्य विकेट गमावली आणि सारा सामनाच होत्याचा नव्हता झाला. पहिल्या डावात 82 धावांवर दुर्दैवीरीत्या धावचीत झालेला यशस्वी दुसऱ्या डावात तिसऱ्या पंचांच्या चुकीमुळे 84 धावांवर बाद झाला. दोन्ही डावांत त्याचे शतक हुकले. तसेच कॅलेंडर वर्षात 1500 धावांचा विक्रमही थोडक्यात हुकला. त्याने 15 कसोटींत 1478 धावा केल्या. हिंदुस्थानच्या कसोटी इतिहासात केवळ सचिन तेंडुलकरनेच 2010 साली 1500 पेक्षा अधिक धावा (1562) केल्या आहेत.

तिसऱ्या पंचांचा पक्षपाती नॉकआऊट पंच

पर्थ कसोटीत राहुलला बाद देताना तिसऱ्या पंचांनी घोडचूक केली होती. तीच घोडचूक एमसीजीवरही यशस्वी जैसवालबाबत तिसऱ्या पंचांनी केली. खेळात अचूकता यावी म्हणून क्रिकेटमध्ये तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर केला जात आहे. याचा खेळाला नक्कीच फायदा झालाय. पण आज तिसऱ्या पंचांनी तंत्रज्ञानाला बाजूला ठेवत आपल्या चेंडू बॅट किंवा ग्लोव्हज्ला लागून वळल्याच्या अंदाजावरून यशस्वीला बाद ठरवण्याचा निर्णय दिला. स्निकोमीटरमध्ये चेंडू यशस्वीच्या बॅट किंवा ग्लोव्हज्ला लागल्याची कोणतीही हालचाल झाली नसतानाही तिसरे पंच सैकत शरफूद्दोला यांनी आऊट जाहीर करून बॉक्सिंग डे कसोटीत हिंदुस्थानी संघाला अक्षरशः नॉकआऊट पंच मारला. यशस्वी बाद होताच हिंदुस्थानचा उर्वरित डाव अवघ्या 14 धावांत संपला.

तिसऱ्या पंचांविरुद्ध घोषणाबाजी

यशस्वीची विकेट पंचांनी काढल्यानंतर एमसीजीवर 50 हजारांपेक्षा अधिक संख्येने उपस्थित असलेल्या क्रिकेटप्रेमींनी तिसऱ्या पंचांविरुद्ध प्रचंड घोषणाबाजी करून आपला राग व्यक्त केला. पंचांच्या या निर्णयाबाबत यशस्वीनेही नाराजी व्यक्त केली. मात्र तिसऱ्या पंचांच्या निर्णयाला आव्हान देता येत नसल्यामुळे त्याला निराश होऊन परतावे लागले होते. या निर्णयाबाबत क्रिकेट जगतात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. त्यामुळे तिसऱ्या पंचांच्या निर्णयाचे पोस्टमॉर्टम होणार हे निश्चित आहे.

चहातून विकेटबाधा

3 बाद 121 वरून सर्व बाद 154 असे हिंदुस्थानी फलंदाजीचे सपशेल लोटांगण पाहता खेळाडून चहातून जणू विष नव्हे, विकेटबाधा झाल्यासारखेच भासले. हेडच्या चेंडूवर पंतने आपली विकेट गमावल्यानंतर हिंदुस्थानचा एकही फलंदाज टिकला नाही. पंतनंतर रवींद्र जाडेजा आला. पहिल्या डावात झुंजार शतक झळकवणारा नितीशकुमार रेड्डी आला; पण दोघेही 2 आणि 1 धाव करून बाद झाले आणि 3 बाद 121 अशा स्थितीत असलेल्या हिंदुस्थानची 6 बाद 130 अशी भयावह स्थिती झाली. त्यानंतर हिंदुस्थानचा डाव गुंडाळायला ऑस्ट्रेलियाला फार वेळ लागला नाही. बोलॅण्डने जाडेजानंतर आकाशदीप आणि बुमराचीही विकेट काढत ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब करायला फार वेळ वाट पाहायला लावली नाही.

कोशिश करनेवालों की हार नहीं होती…

दुसऱ्या सत्रात हिंदुस्थानची यशस्वी-पंतची जोडी फोडण्यात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना यश लाभले नाही. ती फोडण्यासाठी पॅट कमिन्स वारंवार गोलंदाजीत बदल करत होता. सामना अनिर्णितावस्थेकडे झुकत होता आणि हळूहळू ऑस्ट्रेलियन संघाचा विश्वासही ढासळत होता. ही जोडी फुटावी म्हणून कमिन्सने पार्टटाइम गोलंदाज ट्रव्हिस हेडच्या हाती चेंडू दिला. चहापानाआधी त्याला यश लाभले नाही, पण चहापानानंतर हेडने पंतला आपल्या जाळ्यात ओढले आणि कमिन्सच्या कोशिशला यश मिळवून दिले. पंतची विकेटच कसोटीला कलाटणी देणारा क्षण ठरला. कमिन्सच्या प्रयत्नांना त्यानंतर कुणीच रोखू शकला नाही. कसोटीत अष्टपैलू कामगिरी करणारा कर्णधार पॅट कमिन्स सामनावीर ठरला. त्याने फलंदाजीत 49, 41 आणि गोलंदाजीत दोन्ही डावांत 117 धावांत 6 विकेट टिपल्या.