पर्थमध्ये विजयाची डरकाळी फोडणारे टीम इंडियाचे शेर अ‍ॅडलेडमध्ये ढेर; 180 धावांमध्ये गारद, स्टार्कचा ‘षटकार’

पर्थमध्ये विजयाची डरकाळी फोडून मालिकेत आघाडी घेणारे टीम इंडियाचे शेर अ‍ॅडलेडमध्ये ढेर झाले आहेत. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याने विकेटचा षटकार ठोकत टीम इंडियाला 180 धावांमध्ये गारद केले.

पहिल्या कसोटीत शतक ठोकणारा यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, मालिकेतील पहिला सामना खेळणारा कर्णधार रोहित शर्मा एकेरी धावसंख्येवर बाद झाले. युवा खेळाडू नितीश रेड्डी याने 42 धावांची आक्रमक खेळी केल्याने संघाला पावणे दोनशे धावांचा टप्पा ओलांडता आला, तर सलामीवीर केएल राहुल याने 37 धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियाकडून मिशेल स्टार्कने सहा, तर पॅट कमिन्स आणि बोलंडने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

पिंक बॉल कसोटीत रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र टीम इंडियाची सुरुवातच खराब झाली. यशस्वी जैस्वाल पहिल्याच चेंडूवर बाद झाला. त्यानंतर केएल राहुल आणि शुभमन गिलने डाव सांभाळात अर्धशतकीय भागिदारी केली. खेळ रंगात आलेला असताना स्टार्कने पुन्हा एकदा टीम इंडियाला धक्का दिला आणि राहुलला (37) बाद केले. त्यानंतर विराट कोहली 7 धावांवर आणि शुभमन गिलही 37 धावांवर बाद झाला. त्यामुळे टीम इंडियाचा डाव 4 बाद 81 धावा असा संकटात सापडला.

चहापानानंतर यात आणखी तीन धावांची भर पडत नाही तोच रोहित शर्माही बाद झाला. त्याने 3 धावा केल्या. पाठपाठ पंतही बाद झाला. नंतर अश्विन (22) आणि नितीश रेड्डीने (42) थोडाफार संघर्ष केला. मात्र हर्षिक राणा आणि जसप्रीत बुमराह भोपळाही फोडू शकले नाह आणि टीम इंडियाचा डाव 180 धावात आटोपला.