स्टीव्हन स्मिथच्या विक्रमी शतकी खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 474 धावांचा डोंगर उभारल्यानंतर रोहित शर्मा-विराट कोहली या दिग्गज फलंदाजांनी पुन्हा एकदा घोर निराशा केली. परिणामतः बॉर्डर-गावसकर (बॉगाक) करंडकाच्या चौथ्या कसोटीच्या दुसऱ्याच दिवशी 5 बाद 164 अशी अवस्था झाल्यामुळे हिंदुस्थान बॅकफूटवर पडला आहे. हिंदुस्थान 310 धावांनी पिछाडीवर असून फॉलोऑनची नामुष्की टाळण्यासाठी 111 धावांची गरज आहे.
ऑस्ट्रेलियाने गुरुवारीच आपल्या आघाडीवीरांच्या दमदार अर्धशतकांच्या जोरावर पहिला दिवस गाजवला होता तर आज स्टीव्हन स्मिथने 34 वे खणखणीत शतक ठोकताना ऑस्ट्रेलियाची धावसंख्या चारशेपार नेत दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रावरही वर्चस्व राखले. कालच्या नाबाद जोडीने आज त्यात बरोबर 100 धावांची भर घालत हिंदुस्थानी गोलंदाजांची चांगलीच परीक्षा घेतली. स्मिथ आणि कमिन्सने हिंदुस्थानी गोलंदाजांना नुसते सतावले नाही तर वेगात धावाही फटकावल्या. 63 चेंडूंत 49 धावा चोपल्यावर कमिन्सच्या रूपाने हिंदुस्थानला पहिले यश लाभले. दोघांनी सातव्या विकेटसाठी 112 धावांची मौल्यवान भागी रचली. त्यानंतर स्मिथने तळाच्या फलंदाजांसोबत छोटय़ा-छोटय़ा भागीदाऱया करत संघाला साडेचारशेचाही पल्ला गाठून दिला. हिंदुस्थानकडून बुमराने 99 धावांत 4 विकेट घेतल्या तर जाडेजाने 78 धावांत 3 विकेट टिपल्या.
रोहितचा खेळ पाच चेंडूंतच संपला
फलंदाजीला सूर गवसावा म्हणून शुबमन गिलची विकेट घेत सलामीला उतरलेल्या सलामीवीर रोहित शर्माचा खेळ अवघ्या पाच चेंडूंतच संपला. सहाव्या क्रमांकावर धावा होत नसल्यामुळे राहुलला तिसऱ्या क्रमांकावर खेळविताना सलामीला उतरलेल्या रोहितला आजही धावांनी निराश केले. तो यशस्वी जैसवालसह सलामीला उतरला खरा, पण पाच चेंडूंत 3 धावा केल्यानंतर पुन्हा एकदा त्याला ऑस्ट्रेलियन कर्णधाराने गंडवले. दुसऱ्याच षटकात रोहित बाद झाल्यामुळे हिंदुस्थानी संघावर चांगलेच दडपण आले. या अपयशी खेळीमुळे रोहितचा कसोटीचा काळ सुरू असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. मात्र आजच्या अपयशामुळे रोहितवर चोहोबाजूंनी टीकास्त्र सोडले जात असल्यामुळे त्याच्यावर कसोटीतून निवृत्त होण्याचाही दबाव वाढू लागला आहे. मेलबर्न कसोटीचा निकाल रोहितच्या कसोटी कारकीर्दीचाही निकाल लावणारा ठरणार आहे. तो कर्णधार असला तरी त्याच्या नेतृत्वाखाली संघ सलग चार कसोटी सामन्यांत हरला आहे आणि दुसरीकडे त्याच्या अपयशी खेळ त्याला संघाबाहेर बसण्याचे आदेश देत असल्याचे दिसतेय.
स्मिथ लवकरच दसहजारी
गेली दीड वर्ष शतकासाठी झगडत असलेल्या स्टीव्हन स्मिथने सलग दुसऱया कसोटीतही शतक झळकावत आपल्या सुराला घट्ट गवसणी घातली. त्याने 34 वे कसोटी शतक झळकावताना हिंदुस्थानविरुद्ध 11 वे कसोटी शतकही साकारले आणि तो हिंदुस्थानविरुद्ध सर्वाधिक शतके ठोकणारा फलंदाज ठरला. आज 197 चेंडूंत 13 चौकार आणि 3 षटकार खेचताना स्मिथने हिंदुस्थानी गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला. आजच्या 140 धावांमुळे स्मिथची कसोटी धावसंख्या 9949 पर्यंत पोहोचली असून तो ‘दसहजारी मनसबदार’ होण्यापासून केवळ 51 धावा दूर आहे. गेल्या कसोटीतही त्याने 101 धावांची खेळी केली होती. ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक शतके रिकी पॉण्टिंगने (41) ठोकली आहेत. तसेच दहा हजार कसोटी धावा आतापर्यंत पॉण्टिंग, बॉर्डर आणि स्टीव्ह वॉ या तिघांनाच गाठता आल्या आहेत.
…ती धाव यशस्वीला महागात पडली
रोहित बाद झाल्यावर यशस्वी आणि राहुलने हिंदुस्थानी डावाला सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. दोघांनी दुसरे सत्र जवळजवळ खेळून काढले होते. चहापानापूर्वीच्या शेवटच्या चेंडूवर कमिन्सने राहुलचा भन्नाट त्रिफळा उडवत हिंदुस्थानी संघाच्या अक्षरशः पोटात गोळा आणला. त्यानंतर यशस्वी आणि विराटने संयमी खेळ करत हिंदुस्थानी संघाला सावरले. एकीकडून यशस्वी खणखणीत चौकारांची बरसात करत होता तर दुसरीकडे विराटही खेळपट्टीवर पाय रोवून उभा होता. दोघांचा खेळ संघाच्या डावाला मजबुती देत होता. या दोघांनी शतकी भागीही रचली. दिवसाचा खेळ संपायला अवघी 20 मिनिटे शिल्लक असल्यामुळे हीच जोडी अभेद्य असेल, असे चित्र होते. पण 41 व्या षटकात यशस्वीचा चोरटी धाव काढण्याचा प्रयत्न संघाला फार महागात पडला. यशस्वीचा स्ट्रेट ड्राइव्ह एक धाव नसल्यामुळे विराट पाठमोरा जागीच उभा राहिला आणि यशस्वी धाव चोरण्याच्या प्रयत्नात दुसऱया एण्डला पोहोचला आणि त्याच्या जबरदस्त खेळीचाच एण्ड झाला. यशस्वीने 118 चेंडूंत 11 चौकार आणि 1 षटकार ठोकत 82 धावा काढल्या. त्याला आपले आणखी एक शतक झळकावण्याची नामी संधी होती, पण धाव चोरण्याच्या जोखीम त्याला आणि संघाला भलतीच महागात पडली. यशस्वी बाद झाल्यानंतर विराट कोहलीनेही आपला संयम गमावला आणि तो बोलॅण्डच्या ऑफ स्टम्पबाहेरच्या चेंडूवर पुन्हा फसला. आठ चेंडूंत हिंदुस्थानी संघाने डावावरचे आपले नियंत्रणच गमावले. मग पुढच्याच षटकात बोलॅण्डने नाइट वॉचमन आकाशदीपलाही टिपत हिंदुस्थानची 2 बाद 153 वरून 5 बाद 159 अशी घसरगंडी उडवली. त्यानंतर ऋषभ पंत आणि रवींद्र जाडेजाने उर्वरित नऊ चेंडू सावधपणे खेळून काढले.