कर्णधार रोहित शर्मा ऑस्ट्रेलियात दाखल होताच दुसऱ्या कसोटीत सलामीची जोडी कोण असेल? अशी चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे. मात्र रोहित जरी दुसऱया सामन्यात खेळणार असला तरी यशस्वी आणि राहुल यांनाच सलामीला उतरवले पाहिजे. रोहित तिसऱया क्रमांकावर आणि शुबमन पाचव्या क्रमांकावर खेळू शकतो. रोहित सलामीला आला तर राहुलला तिसऱया स्थानी फलंदाजी करावी लागेल, मात्र राहुलने टॉप ऑर्डरमध्ये फलंदाजी करणे गरजेचे आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात 295 धावांनी विजय मिळवल्यानंतर सलामीचे संयोजन बदलू नये, अशी अपेक्षा हिंदुस्थानचा कसोटीपटू चेतेश्वर पुजाराने व्यक्त करत रोहितला सल्ला देण्याचा प्रयत्न केला आहे.
पर्थवर हिंदुस्थानने ऑस्ट्रेलियाला चांगलाच दणका दिला होता. वैयक्तिक कारणामुळे रोहित या कसोटीत खेळू शकला नव्हता. त्याच्या अनुपस्थितीमध्ये राहुल आणि यशस्वी सलामीला उतरले आणि या जोडीने द्विशतकी भागीही रचली. आता अॅडलेडवर शर्मासह गिलही संघात असेल. अंगठय़ाच्या दुखापतीमुळे पहिल्या कसोटीतून बाहेर पडलेल्या गिलला दुसऱया कसोटीतही स्थान मिळण्याची अपेक्षा आहे. गिलसाठी पाच क्रमांक हा योग्य ठरले. जरी हिंदुस्थानने दोन विकेट लवकर गमावल्या तरी गिल नवीन चेंडूला सामोरे जाऊ शकतो. तसेच पंतलाही नवीन चेंडूचा सामना करावा लागणार नाही.