IND vs NZ – वॉशिंग्टनचा सुंदर मारा, न्यूझीलंड 259 धावांवर रोखले

>>विठ्ठल देवकाते

तब्बल साडेतीन वर्षांनंतर टीम इंडियाच्या कसोटी संघात संधी मिळालेल्या वॉशिंग्टन सुंदरने न्यूझीलंडची चांगलीच फिरकी घेत मैदानावर ‘सत्ता’ गाजविली. या अष्टपैलू फिरकीपटूने दुसऱया कसोटी क्रिकेट सामन्यात सात फलंदाजांना आपल्या जाळय़ात अडकवत न्यूझीलंडला पहिल्या डावात 259 धावसंख्येवर रोखण्यात सिंहाचा वाटा उचलला. आघाडीचे 3 विकेट रविचंद्रन अश्विनने टिपले, मात्र प्रत्युत्तरादाखल हिंदुस्थानी कर्णधाराला भोपळाही न पह्डता आल्याने हिंदुस्थानी संघाला मोठा धक्का बसला. त्यानंतर यशस्वी जैस्वाल (खेळत आहे 6) व शुबमन गिल (खेळत आहे 10) यांनी अधिक पडझड होऊ न देता पहिल्या दिवसअखेर 11 षटकांत 1 बाद 16 धावसंख्येपर्यंत मजल मारली.

कॉन्वे, रचिन यांची अर्धशतके

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे स्टेडियमवर नाणेफेकीचा काwल जिंकून प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 79.1 षटकांत 259 धावसंख्या उभारली. आठव्या षटकात मोर्चावर आलेल्या रविचंद्रन अश्विनने कर्णधार टॉम लॅथमला (15) पायचित पकडून हिंदुस्थानला पहिले यश मिळवून दिले. त्याच्या जागेवर आलेल्या विल यंगलाही (18) अश्विननेच यष्टीमागे पंतकरवी झेलबाद करून न्यूझीलंडचा दुसरा धक्का दिला.

किवींना जेवणातून विकेटबाधा

उपाहाराचा खेळ थांबला तेव्हा न्यूझीलंडने 2 बाद 92 धावा केल्या होत्या. त्यानंतर दुसरा सलामीवीर ड्वेन क्वॉन्वे (76) व आलेला रचिन रवींद्र (65) यांनी अर्धशतके झळकावली. अश्विनने क्वॉन्वेला बाद करून ही जोडी पह्डली. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदरचे मॅझिक सुरू झाले. अश्विनने आघाडीची फळी उद्ध्वस्त केल्यानंतर वॉशिंग्टनने अवघ्या 62 धावांत उर्वरित सात फलंदाज कापून काढल्याने पाहुण्यांचा पहिला डाव पहिल्या दिवशीच संपला. यातील 5 फलंदाजांचे त्याने दांडके उडविले, हे विशेष. हिंदुस्थानकडून सर्व दहा विकेट हे फिरकी जोडगोळीने टिपण्याचा पराक्रम करून दाखविला.

न्यूझीलंडविरुद्ध हिंदुस्थानी गोलंदाजांचे सर्वोत्तम आकडे

8/72 एस. वेंकटराघवन – दिल्ली (1965)
8/76 इरापल्ली प्रसन्न – ऑकलंड (1975)
7/59 आर. अश्विन – इंदूर (2017)
7/59 वॉशिंग्टन सुंदर – पुणे (2024)