देशात आणखी एक ‘टोलचा झोल’ उघड, रस्तेबांधणीसाठी खर्च 1896 कोटी, टोलवसुली तब्बल 8349 कोटी रुपयांची

राज्याला आणि देशाला टोलचा झोल नवा नाही. टोलच्या नावाखाली अव्वाच्या सव्वा वसुली केली जात आहे. महाराष्ट्रातील रस्तेबांधणीचा खर्च वसूल झाल्यावरही टोलवसुली सुरू राहून लाखो रुपये रस्तेबांधणी कंपन्या खिशात घालत असल्याचे प्रकरण उजेडात आले होते. याच पद्धतीने राजस्थानमध्ये राष्ट्रीय महामार्ग 8 च्या टोल नाक्यावर सुरू असलेली एक वाटमारी माहितीच्या अधिकाराखाली उघडकीस आली आहे.

दिल्लीला राजस्थान, गुजरात मार्गे मुंबईला जोडणाऱया राष्ट्रीय महामार्गावरील जयपूर येथील मनोहरपूर टोल प्लाझा येथे 3 एप्रिल 2009 पासून टोल वसूल केला जात होता. याबद्दल एका आरटीआय कार्यकर्त्याने तपशीलवार माहिती मागवली होती. रस्ते बांधणीसाठी एकूण किती खर्च आला आणि त्यात सरकारचा वाटा किती, अशीही विचारणा कुलदीप सिंग या माहिती कार्यकर्त्याने केली होती. तेव्हा, या महामार्गाच्या बांधकामासाठी एकूण 1896 कोटी रुपये खर्च झाल्याचे सांगण्यात आले. आणि याच रस्त्यावरच्या मनोहरपूर टोल प्लाझा येथे आतापर्यंत 8349 कोटी रुपयांचा टोल वसूल केल्याचेही याच उत्तरात उघड झाले. ही रक्कम इतकी मोठी आहे की त्याचा वापर करून गुरुग्राम ते जयपूरपर्यंत चार महामार्ग तयार करता येतील. खर्च वसूल झाल्यावरही असे टोलनाके सुरूच ठेवल्याबद्दल सोशल मीडियावर लोकांनी संताप आणि नाराजी व्यक्त केली आहे.

लोकांचे अनेक प्रश्न

रोड टॅक्स – वाहन नोंदणीच्या वेळी रोड टॅक्स घेतला जातो, मग दर 50 किलोमीटरवर आणखी टोल वसुली कशासाठी?

 लपवाछपवी – इतर प्रमुख महामार्गांवरही टोल प्लाझाची अशी आकडेवारी तपासली, तर अशाच चारपट नफ्याचे आकडे समोर येतील का?

सुधारणा- टोलनाक्यांद्वारे जमा होणाऱया रकमेबाबत लपवाछपवी कशासाठी, टोलनाके बंद करण्याची गरज आहे का, असे प्रश्नही लोकांनी उपस्थित केले. सरकारने या वाटमारीकडे लक्ष द्यावे आणि टोलवसुली धोरणात सुधारणा करावी, असेही लोकांनी सुचवले आहे.