
आगामी काळात हिंदुस्थानात आयसीसीच्या तीन क्रिकेट स्पर्धा खेळविल्या जाणार असून त्यापैकी एक स्पर्धा म्हणजे महिलांचा वन डे वर्ल्ड कप. येत्या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात ही स्पर्धा खेळविली जाणार असून विशाखापट्टणम येथे उद्घाटनीय लढत खेळविली जाणार आहे. या स्पर्धेतील सामने विशाखापट्टणमसह गुवाहाटी, मुल्लानपूर (पंजाब), इंदूर आणि तिरुवनंतपुरम येथेही खेळविले जाणार असल्याचे बीसीसीआयकडून कळले आहे. मात्र याबाबत अंतिम कार्यक्रम लवकरच जाहीर केला जाणार आहे.
हिंदुस्थानात आजवर महिलांच्या तीन एकदिवसीय क्रिकेटच्या वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात आले आहे. याआधी 1978, 1997, आणि 2013 साली हिंदुस्थानने वन डे वर्ल्ड कपचे यशस्वी आयोजन केले होते. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा विशाखापट्टणमला खेळविला जाणार आहे. बीसीसीआयच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला असला तरी अन्य चार मैदानांबाबतच अंतिम निर्णय लवकरच घेतला जाणार असल्याची माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली आहे.
मुंबई-वडोदऱ्याचाही विचार
बीसीसीआय या स्पर्धेच्या आयोजन स्थळांबाबत मुंबई आणि वडोदरा या केंद्रांचाही विचार करत आहे. मात्र सप्टेंबर-ऑक्टोबर या काळात पावसाळी वातावरण असल्यामुळे येथे स्पर्धा खेळवणे योग्य नसल्याचे त्रासदायक ठरू शकते. ही स्पर्धा पाच केंद्रांवर खेळविणार असल्याचे बीसीसीआयने निश्चित केले आहे आणि याबाबत अंतिम निर्णय ते लवकरच आयसीसीला कळवून स्पर्धेचा अंतिम कार्यक्रम जाहीर करणार आहेत. विशाखापट्टणम येथे आयपीएलचे सामने नियमित होत असल्यामुळे येथे उद्घाटन होईल.