‘आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी’ क्रिकेट स्पर्धेसाठी ‘बीसीसीआय’ने शनिवारी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील 15 सदस्यीय हिंदुस्थानी संघ जाहीर केला. शुभमन गिलकडे या संघाचे उपकर्णधारपद सोपविण्यात आले आहे. दुखापतीतून सावरल्यानंतर फिटनेस सिद्ध करणारा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचे टीम इंडियात पुनरागमन झाले आहे. प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराबाबत संदिग्धता होती. मात्र, तोही ‘चॅम्पियन्स ट्रॉफी’ खेळणार आहे. मात्र, इंग्लंडविरुद्धच्या वन डे मालिकेदरम्यान जसप्रीत बुमरा खेळणार नसल्याने त्याच्या जागी हर्षित राणा खेळणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवडलेला संघच इंग्लंडविरुद्धच्या वन डे मालिकेत खेळणार आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी आणि इंग्लंडविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी जाहीर करण्यात आलेल्या हिंदुस्थानी संघात काही बदल करण्यात आले आहेत. मोहम्मद शमी तब्बल 14 महिन्यांनंतर ‘टीम इंडिया’त पुनरागमन करीत आहे. तो 2024च्या वन डे वर्ल्ड कपपासून दुखापतीमुळे संघातून बाहेर होता. विशेष म्हणजे, यशस्वी जैसवालला प्रथमच एकदिवसीय संघात स्थान मिळाले आहे.