
पाकिस्तानने जम्मू-कश्मीरच्या काही भूभागावर बेकायदेशीरपणे कब्जा करणे सुरूच ठेवले असून तो प्रदेश त्यांना खाली करावा लागेल, अशा शब्दांत संयुक्त राष्ट्रांच्या शांतता प्रस्थापित सुधारणांवरील चर्चेदरम्यान हिंदुस्थानने पाकला फटकारले.
पाकिस्तानने पुन्हा एकदा हा मुद्दा उकरून काढल्यानंतर हिंदुस्थानने जोरदार प्रत्युत्तर दिले. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत संबोधित करताना हिंदुस्थानचे स्थायी प्रतिनिधी, राजदूत पार्वतनेनी हरीश यांनी जम्मू-कश्मीर हिंदुस्थानचा अविभाज्य भाग होता, आहे आणि तो नेहमीच राहील, असे स्पष्ट केले.
हिंदुस्थानने म्हटले की, जम्मू कश्मीरचा पाकिस्तानकडून करण्यात आलेला वारंवार उल्लेख अयोग्य असून हा प्रदेश हिंदुस्थानचा अविभाज्य घटक आहे. पाकिस्तानने पुन्हा एकदा मुद्दा उपस्थित केल्यामुळे आम्हाला याची दखल घ्यावी लागत आहे. त्यांनी असा वारंवार उल्लेख केल्यामुळे त्यांचे बेकायदेशीर दावे सिद्ध होत नाहीत आणि त्यांच्या सीमापार दहशतवादाचे समर्थन होत नाही. पाकिस्तानने येथील काही भागांवर बेकायदेशीरपणे कब्जा मिळवला असून त्यांना हा ताबा सोडावा लागेल. पाकिस्तानने त्यांचा फूट पाडणारा अजेंडा चालवण्यासाठी या मंचाचे लक्ष वळवण्याचा प्रयत्न करू नये.
दहशतवाद, शत्रुत्व आणि हिंसामुक्त वातावरणाची गरज असल्याचे हिंदुस्थानने वारंवार सांगितले आहे. मात्र पाकने सतत दहशतवाद्यांना प्रोत्साहन देत जम्मू-कश्मीरची शांतता भंग करण्याचे काम केले. ५ ऑगस्ट २०१९ रोजी केंद्र सरकारने संविधानातील कलम ३७० रद्द केला. त्यानंतर हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील संबंध आणखी बिघडले.