संयुक्त राष्ट्राच्या महासभेच्या 79 व्या सत्रात पाकिस्तानने नेहमीप्रमाणे हिंदुस्थानच्या विरोधात गरळ ओकण्याचे काम करताच हिंदुस्थानने पाकिस्तानला चांगलेच फटकारले. जो देश लष्कराकडून चालविला जातो, ज्यांना जागतिक पातळीवर दहशतवाद, अंमली पदार्थांचा व्यापार, आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीसाठी ओळखले जाते, त्या देशाने जगाला असहिष्णुतेवर भाषण देणे बंद करावे, अशा शब्दांत हिंदुस्थानच्या राजनैतिक अधिकारी भाविका मंगलानंदन यांनी पाकिस्तानला सुनावले. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी हिंदुस्थानात इस्लामोफोबिया वाढल्याचे म्हटले. या आरोपालाही हिंदुस्थानने सडेतोड प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानने आमच्या संसदेवर, मुंबईवर, बाजार आणि तीर्थयात्रेच्या मार्गावर हल्ले केले. ही यादी बरीच मोठी आहे. अशा देशाने हिंसाचारावर बोलणे म्हणजे यापेक्षा मोठे दांभिकतेचे उदाहरण असू शकत नाही, असेही त्या म्हणाल्या.
पाकिस्तानसोबत चर्चा नाही
जोपर्यंत दहशतवाद संपला जात नाही तोपर्यंत पाकिस्तानसोबत कोणत्याही प्रकारच्या रणनीतीवर चर्चा केली जाणार नाही. दहशतवाद्यांसोबत कोणतीही तडजोड केली जाऊ शकत नाही. ओसामा बिन लादेनला आश्रय देणे आणि असंख्य दहशतवादी घटनांमध्ये पाकिस्तानचा हात आहे. पाकिस्तानचा खोटारडेपणा संपूर्ण जगाला माहिती आहे. पाकिस्तानने कितीही ओरडून सांगितले तरी सत्य बदलणार नाही, असे हिंदुस्थानने म्हटले.
शाहबाज शरीफ काय म्हणाले?
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पुन्हा एकदा कश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. हिजबुलचा कमांडर बुरहान वानीच्या मृत्यूचा विषय उपस्थित केला. 20 मिनिटांच्या भाषणात शरीफ यांनी जम्मू-कश्मीरमध्ये पुन्हा अनुच्छेद 370 लागू करून शांतता प्रस्थापित करावी, असे म्हटले. पॅलेस्टाईनमधील जनता आणि जम्मू-कश्मीरच्या लोकांमध्ये काहीही फरक नाही. दोन्हीकडील नागरिक हे स्वातंत्र्य आणि आत्मसन्मानासाठी अनेक वर्षांपासून संघर्ष करत आहेत, असेही ते म्हणाले.