ग्लोबल फायरपॉवर मिलिट्री स्ट्रेंथने नुकतीच जगातील शक्तिशाली लष्कराची यादी जाहीर केली. 2024 सालच्या या यादीत अमेरिका पहिल्या स्थानावर आहे. त्याखालोखाल रशिया आणि चीनचा नंबर आहे. शक्तिशाली लष्कराच्या यादीत हिंदुस्थान चौथ्या क्रमांकावर आहे. पाकिस्ताननेही टॉप टेनमध्ये स्थान मिळवले असून पाकिस्तान नवव्या स्थानावर आहे. पाकिस्तानी लष्कराचा विचार केला तर पाकिस्तानकडे 3700 हून अधिक रणगाडे, 1400 लढाऊ विमाने आणि 17 लाख सैनिक आहेत. पाकिस्तानकडे थळसेना, वायुसेना, नौदल यांच्यासह नॅशनल गार्ड आणि सिव्हिल सशस्त्र दल यासारख्या निमलष्करी दलाचा समावेश आहे. याशिवाय 50 हजारांपेक्षा अधिक आर्म्ड व्हेईकल, 600 रॉकेट लाँचर, आठ पाणबुडय़ा, 114 जहाजे आणि 387 लढाऊ विमाने यांचा समावेश आहे. ग्लोबल फायरपॉवरने पाकिस्तानला पॉवर इंडेक्समध्ये 0.1711 पॉइंट दिले. पाकिस्तानी लष्कराचा खर्च 6.3 अब्ज डॉलर आहे.