माता मृत्युदरात हिंदुस्थान चौथा

pregnant-women

जागतिक आरोग्य दिनानिमित्त जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) जारी केलेल्या मूल्यांकनानुसार हिंदुस्थानने प्रसूतीदरम्यान होणाऱ्या महिलांचा मृत्युदर कमी करण्यात लक्षणीय प्रगती केली आहे. मात्र, तरीदेखील जगात माता मृत्युदरात हिंदुस्थान चौथ्या क्रमांकावर आहे. गर्भवती असताना किंवा गर्भधारणा संपुष्टात आल्यानंतर 42 दिवसांच्या आत गर्भधारणेशी संबंधित कारणामुळे महिलेचा मृत्यू झाल्यास आरोग्य संघटना याची गणना माता मृत्युदरात करते.

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, प्रसूती कालावधीत प्रत्येकवर्षी जवळपास 3 लाख महिलांना आपला जीव गमवावा लागतो. तसेच जन्म झालेले नवजात शिशू पहिल्या महिन्यात 20 लाख दगावतात, असे समोर आले. प्रसूतीनंतर होणारा रक्तस्राव अशा काही कारणांमुळे मातांचा मृत्यू होऊ शकतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या ताज्या अहवालानुसार, 2023 मध्ये हिंदुस्थानात 19,000 माता मृत्यूची नोंद झाली आहे. जागतिक मृत्युदरात याचे जवळपास 7.2 टक्के एवढे प्रमाण होते. या यादीत माता मृत्युदरात 28.7 टक्क्यांसह नायजेरियाचा वाटा आहे. हिंदुस्थानात दर 1,00,000 जन्मांमागे 80 मातांच्या मृत्यूंची नोंद आहे.