2040 पर्यंत हिंदुस्थानीना चंद्रावर उतरवणार; इस्रो प्रमुखांनी दिली माहिती

2040 पर्यंत हिंदुस्थानीना चंद्रावर उतरवण्याचे आमचे ध्येय असल्याचे इस्रो अर्थात हिंदुस्थानी अंतराळ संशोधन संस्थेचे प्रमुख डॉ. एस सोमनाथ यांनी म्हटले आहे. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी आपल्याला अवकाश स्थानक उभारावे लागेल. कारण, चंद्रावर मानवाला पाठवण्यासाठी मध्यवर्ती माध्यम गरजेचे असून त्यासाठी सूक्ष्म गुरुत्वाकर्षण संशोधन आणि विशेष अवकाश मोहिमा आखाव्या लागतील, अशी माहिती इस्रोप्रमुखांनी दिली.

आज झुंझुनू जिह्यातील बिर्ला इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स पिलानी इन्स्टिटय़ूटमध्ये आयोजित दीक्षांत समारंभात ते बोलत होते. अमेरिकन उद्योगपती एलॉन मस्क चंद्रावर मानव पाठवण्याची आणि मंगळावर कॉलनी स्थापन करण्याची योजना आखत आहेत. लाखो लोकांसाठी तेथे वसाहत बांधण्याची योजना आहे, याकडेही सोमनाथ यांनी लक्ष वेधले. अंतराळ पर्यटनाचे क्षेत्र उभारण्याची हिंदुस्थानकडे प्रचंड क्षमता आहे. आमची चंद्र आणि मंगळ मोहीम ही जगातील सर्वात कमी खर्चाची मोहीम असल्याचेही एस. सोमनाथ म्हणाले. दरम्यान, आम्ही पुढील 5 ते 60 वर्षांच्या भविष्यासाठी कार्यक्रमांची रूपरेषादेखील तयार केली आहे. सरकारने यासाठी 30 हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्पही जाहीर केल्याचे त्यांनी नमूद केले.