‘आम्ही तटस्थ नाही…!’ रशिया-युक्रेन युद्धावर PM मोदींनी स्पष्ट केली हिंदुस्थानची भूमिका

फोटो- रॉयटर्स

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय अमेरिका दौऱ्यावर आहेत. व्हाईटहाऊसमध्ये मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. या भेटीनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी पंतप्रधान मोदींनी रशिया-युक्रेन युद्धावर हिंदुस्थानची भूमिका स्पष्ट केली. अनेकांचा असा गैरसमज आहे की रशिया-युक्रेन युद्धामध्ये हिंदुस्थान तटस्थ आहे. पण हिंदुस्थान तटस्थ नसून आम्ही शांततेच्या बाजुने उभे आहोत, असे मोदी म्हणाले.

गेल्या तीन वर्षापासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धामध्ये प्रचंड जीवित आणि वित्तहानी झाली आहे. या युद्धाबाबत हिंदुस्थानची भूमिका काय? असे विचारले असता मोदी म्हणाले की, ‘मी नेहमीच रशिया आणि युक्रेनच्या संपर्कात राहिलो असून दोन्ही देशांच्या नेत्यांची भेटही घेतली आहे. अनेकांचा असा गैरसमज आहे की रशिया-युक्रेन युद्धात हिंदुस्थान तटस्थ भूमिकेत आहे. पण हिंदुस्थान तटस्थ नसून आम्ही शांततेच्या बाजुने उभे आहोत.’

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांच्या उपस्थितीत माध्यमांशी बोलताना मी सांगितले होते की, ही युद्धाची वेळ नाही. समस्यांचे निराकरण युद्धभूमीवर नाही तर चर्चेच्या टेबलवर निघते. युद्धावर तोडगा तेव्हाच निघू शकेल जेव्हा रशिया आणि युक्रेन हे दोन्ही देश चर्चेच्या व्यासपीठावर येतील, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. यावेळी मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांनी उचललेल्या पावलांनाही पाठिंबा दर्शवला आणि त्याचे स्वागत केले. रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यात ते लवकरच यशस्वी होतील, अशी आशाही मोदींनी व्यक्त केली.

याच संदर्भात बोलताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबवण्यात चीनची भूमिकाही महत्त्वाची आहे. कोविड महामारीच्या आधीपर्यंत चीनसमोर माझे संबंध चांगले होते. चीन जगातील महत्त्वाचा देश आहे. चीन, हिंदुस्थान, रशिया आणि अमेरिका एकत्र काम करू शकतात.

मस्क हिंदुस्थानात करणार उद्योग विस्तार, मोदी यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा