‘हवाई दलाला दरवर्षी 30 ते 40 लढाऊ विमानांची गरज, तरच…’, IAF प्रमुखांचं विधान; सांगितला ‘मास्टर प्लॅन’

हिंदुस्थानच्या हवाई दलाला प्रत्येक वर्षी 30 ते 40 लढाऊ विमानांची गरज आहे. तरच मिराज, मिग-29 आणि जॅगवार सारख्या जुन्या विमानांना सेवेतून मुक्त करता येईल, असे हिंदुस्थानच्या हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंह यांनी म्हटले आहे. दिल्लीतील एका कार्यक्रमात ते बोलत होते.

हवाई दलाचे प्राधान्य स्वदेशी बनावटीच्या लढाऊ विमानांना असल्याचेही एअर चीफ मार्शल ए. पी. सिंह यावेळी म्हणाले. हे लक्ष्य साध्य करण्यासाठी खासगी क्षेत्रातील भागीदारी वाढवण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

हवाई दलाकडे सध्या 31 स्क्वॉड्रन आहे. मात्र हवाई दलाला 42 स्क्वॉड्रनची आवश्यकता आहे. यासाठी हिंदुस्थानमध्ये दरवर्षी किमान 30 ते 40 लढाऊ विमानांची निर्मिती होणे गरजेचे आहे आणि हे लक्ष्य साध्य करणे अशक्य नाही, असे एअर चीफ मार्शल ए. पी. सिंह म्हणाले.

दरम्यान, याआधी एअर चीफ मार्शल ए. पी. सिंह यांनी लढाऊ विमानांच्या पुरवठ्याबाबत चिंता व्यक्त केली होती. हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेडवर (एचएएल) विश्वास नसल्याचे वक्तव्य त्यांनी केले होते. बंगळुरू एअर शो दरम्यान ए.पी. सिंह यांनी हवाई दलाच्या अधिकार्‍यांशी बोलताना तेजसच्या वितरणाबद्दल नाराजी व्यक्त केली होती. मात्र आता एचएएलने पुढील वर्षी 24 तेजस मार्क-1ए लढाऊ विमानं बनवण्याचे आश्वासन दिल्याचे, ए.पी. सिंह यांनी सांगितले.

‘तेजस’ विमानांना विलंब… एचएएलवर विश्वास उरला नाही; हवाई दलाचे प्रमुख भडकले


काय आहे प्लॅन?

हवाई दलाचे प्राधान्य स्वदेशी लढाऊ विमानांना आहे. मला पूर्ण विश्वास आहे की आपण 90 टक्के स्वदेशी तंत्र वापरून जरी लढाऊ विमानं बनवली तरी त्याचीच आम्ही निवड करू. यासाठी आपण नेहमी विदेशी तंत्रावर अवलंबून राहणेही योग्य नाही. तसेच एचएएलकडे दरवर्षी 30 लढाऊ विमानं बनवण्याची क्षमता आहे. यासह खासगी क्षेत्रातील कंपन्यांची भागीदारी केल्यास आपण आणखी 12 ते 18 लढाऊ विमानं बनवू शकू. हवाई दलाला दरवर्षी दोन स्क्वॉड्रनची अर्थात 30 ते 40 विमानांची गरज आहे. ही विमानं जशी येतील तशी मिराज, मिग-29 आणि जॅगवार ही कालबाह्य झालेली विमानं हळूहळू सेवामुक्त करण्यात येतील, असा मास्टर प्लॅनही एअर चिफ मार्शल ए. पी. सिंह यांनी सांगितले.