ब्रिटनमध्ये राहणाऱ्या हिंदुस्थानी नागरिकांची संपत्ती दिवसेंदिवस वाढत असून आता लंडनमध्ये राहणाऱ्या व्यक्तींमध्ये ब्रिटिशांपेक्षा जास्त मालमत्ता हिंदुस्थानी व्यक्तींच्या नावावर आहे, अशी माहिती एका अहवालातून समोर आली आहे. लंडनस्थित एका प्रॉपर्टी डेव्हलपरने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला असून यात हा दावा केला आहे. लंडनमधील सर्वात जास्त मालमत्तेचे मालक आता हिंदुस्थानी आहेत. बॅरेट लंडनने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. ज्यामध्ये लंडनमधील हिंद्स्थानी नागरिक मालमत्ता खरेदीदारांना वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागले गेले आहे. यामध्ये पिढ्यान्पिढ्या ब्रिटनमध्ये राहणारे हिंदुस्थानी वंशाचे रहिवासी, एनआरआय, परदेशी गुंतवणूकदार आणि शिक्षणासाठी स्थलांतरित लोकांचा यात समावेश आहे. आता ब्रिक्स न्यूजने सुद्धा ही बातमी शेअर केलीय.
पाकिस्तान तिसऱ्या नंबरवर
ब्रिटनची राजधानी लंडनच्या प्रॉपर्टी मार्केटमध्ये हिंदुस्थानींचा दबदबा निर्माण झाला आहे, असे अहवालात म्हटले आहे. रिअल स्टेटच्या बाबतीत हिंदुस्थानींनी ब्रिटीशांना मागे टाकले आहे. मालमत्तेच्या मालकीच्या बाबतीत ते पहिल्या स्थानावर आहेत. अपार्टमेंट आणि घरे खरेदीसाठी हिंदुस्थानी लंडनमध्ये 3 ते 4.7 कोटी रुपयांची गुंतवणूक करत आहेत, असे अहवालात म्हटले आहे. हिंदुस्थानी नागरिकांनंतर मालमत्ताधारकांमध्ये ब्रिटिश आणि नंतर पाकिस्तानी लोकांचा नंबर लागतो.