पंतच्या फटकेबाजीने सिडनी कसोटीत रंगत! दुसऱ्या दिवशी तब्बल 15 फलंदाजांचा बळी

सिडनी कसोटीत सलग दुसऱ्या दिवशी वेगवान गोलंदाजांची दहशत बघायला मिळाली. पहिल्या दिवशी 11 फलंदाज बाद झालेल्या खेळपट्टीवर शनिवारी तब्बल 15 फलंदाजांचा बळी गेला. मात्र या गोलंदाजीधार्जिण्या खेळपट्टीवर हिंदुस्थानच्या ऋषभ पंतने खऱ्या अर्थाने दुसरा दिवस गाजवला. त्याने या पाचव्या व अखेरच्या कसोटीत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची टी-20 स्टाईलने धुलाई करताना 33 चेंडूंत 61 धावांची वादळी खेळी करीत सिडनी कसोटीत रंगत निर्माण केली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा हिंदुस्थानने 32 षटकांत 6 बाद 141 धावसंख्या उभारली असून त्यांच्याकडे आता एकूण 145 धावांची आघाडी आहे. रवींद्र जाडेजा 8, तर वॉशिंग्टन सुंदर 6 धावांवर खेळत होते.

ऋषभ पंतचे विक्रमी अर्धशतक

सिडनी कसोटीच्या दुसऱ्या डावात ऋषभ पंतने अवघ्या 29 चेंडूंत अर्धशतक झळकावून ऑस्ट्रेलियात वेगवान कसोटी अर्धशतक ठोकण्याचा पराक्रम केला. यापूर्वी हा विक्रम इंग्लंडच्या जॉन ब्राऊन आणि वेस्ट इंडीजच्या रॉय फ्रेड्रिक्स यांच्या नावावर होता. मात्र आता पंतने या दोघांचा विक्रम मोडीत काढला. पंत फलंदाजीला आला तेव्हा टीम इंडियाची 4 बाद 78 अशी स्थिती होती, मात्र त्याने ऑस्ट्रेलियाच्या प्रत्येक गोलंदाजाची धुलाई केली. या सामन्यात ऋषभ पंतने 33 चेंडूंत 6 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 61 धावांची खेळी केली आहे.

बुमराच्या दुखापतीची अपडेट

सिडनी कसोटीतील दुसऱ्या दिवसाच्या खेळातील उपाहाराच्या वेळी जसप्रीत बुमरा ट्रेनिंग किटमध्ये कारमधून मैदानाबाहेर जाताना दिसला. मग हिंदुस्थानच्या या प्रमुख गोलंदाजाला दुखापत झाल्याची चर्चा वाऱ्यासारखी व्हायरल झाली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा पत्रकार परिषदेत आलेल्या प्रसिध कृष्णाला पत्रकारांनी बुमराबद्दल प्रश्न विचारला. तेव्हा ‘जसप्रीत बुमराच्या पाठीला दुखापत आहे. तो स्कॅनसाठी रुग्णालयात गेला होता. त्याच्या स्कॅनचा रिपोर्ट आल्यावर पुढील गोष्टी कळतील,’ असा खुलासा प्रसिध कृष्णाने केला.