सीरियातील बिघडलेल्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त करत हिंदुस्थान सरकारने सर्व आपल्या नागरिकांना ‘पुढील सूचना मिळेपर्यंत सर्व सीरियाचा प्रवास पूर्णपणे टाळा’, असा सूचना वजा सल्ला दिला आहे.
आपत्कालीन हेल्पलाइन नंबर आणि ईमेल आयडी जारी केलेल्या निवेदनात परराष्ट्र मंत्रालयाने सध्या सीरियामध्ये असलेल्या सर्व हिंदुस्थानींना ‘दमास्कसमधील हिंदुस्थानी दूतावासाच्या संपर्कात राहण्याचं’ आवाहन केलं आहे.
नवी दिल्लीतून जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेत असंही म्हटलं आहे की, ‘ज्यांना शक्य आहे, त्यांनी लवकरात लवकर उपलब्ध विमानांनी (सीरिया) सोडण्याचा सल्ला देत आहोत’. तसेच ‘ज्यांना तसे करणे शक्य नाही त्यांच्यासाठी ‘त्यांच्या सुरक्षिततेबद्दल अत्यंत सावधगिरी बाळगण्यास आणि गरज पडल्यासच बाहेर पडा’, असा सल्ला देण्यात आला आहे.
शेअर करण्यात आलेला आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक +963 993385973 दमास्कसमधील हिंदुस्थानी दूतावासाचा आहे. हा नंबर WhatsApp करण्यासाठीही वापरला जाऊ शकतो, असं त्यात स्पष्ट करण्यात आलं आहे. यासोबतच एक आपत्कालीन ईमेल आयडी [email protected] जारी करण्यात आला आहे. यापैकी कोणत्याही ठिकाणी संपर्क केल्यानंतर अपडेट्स शेअर केले जातील असं देखील नमूद करण्यात आलं आहे.
सीरियात इतकी गंभीर परिस्थिती का आली?
सीरियात 27 नोव्हेंबरपासून लष्कर आणि बंडखोर यांच्यात सुरू असलेला संघर्ष आता चांगलाच चिघळला आहे. लष्करावर मात करत बंडखोर गटाने सीरियातील आणखी एक शहर ताब्यात घेतले आहे. बंडखोरांनी 1 डिसेंबर रोजी सीरियातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर अलेप्पोवर ताबा मिळवला होता. बंडखोरांनी अलेप्पोमधील हमाला ताब्यात घेतल्याने सीरियाचे अध्यक्ष बशर अल-असद आणि त्यांच्या सरकारला मोठा धक्का बसला आहे. नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी लष्कराने आता शहरातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. हमाला ताब्यात घेण्यासाठी बंडखोर सैनिकांची लष्कराशी गेल्या तीन दिवसांपासून झुंज सुरू होती. संरक्षण रेषा तोडण्यासाठी बंडखोरांनी आत्मघाती हल्ले सुरू केल्याचा आरोप लष्कराने केला आहे. या काळात बंडखोरांशी लढताना अनेक जवान शहीद झाले आहेत, असेही सांगितले गेले आहे. हमा हे सीरियातील चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. 2011 मध्ये सीरीयात झालेल्या गृहयुद्धातही हमाला बंडखोरांच्या ताब्यात गेले नव्हते.
कुर्दिश सैनिकांनी अलेप्पोचा काही भागही ताब्यात घेतला आहे. गेल्या आठवडय़ापर्यंत असदच्या सैन्याच्या ताब्यात असलेला काही भाग आता कुर्दिश सैनिकांच्या ताब्यात गेला आहे. हे कुर्दिश लढवय्ये बंडखोर गटाच्या विरोधातही लढत आहेत. त्यामुळे बंडखोर गटांनी अलेप्पोमधील कुर्दिश सैनिकांच्या ठाण्यांवर हल्ले केले आहेत.