
हिंदुस्थान सरकारने चीनमधून येणाऱ्या पाच उत्पादनांवर अॅण्टी-डम्पिंग म्हणजेच वाढीव शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यात अॅल्युमिनियम, फॉइल, व्हॅक्यूम फ्लास्क, सॉफ्ट फेराइट कोर्स आणि ट्रायक्लोरो असोसियन्युरिक ऑसिड, पॉली व्हाइनिल क्लोराइड पेस्ट रेझिन या पाच उत्पादनांचा समावेश आहे. हे शुल्क पाच वर्षांसाठी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
वाणिज्य मंत्रालयाच्या तपास युनिट डीजीटीआरच्या शिफारशीनंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. या शुल्कामुळे हिंदुस्थानातील कंपन्यांना दिलासा मिळणार आहे. अॅण्टी-डम्पिंग शुल्क म्हणजेच देशातील उत्पादकांना परदेशातील प्रतिस्पर्धी उत्पादक कंपन्यांकडून हानी पोहोचत असल्यास त्यांची निर्यात किंमत आणि सामान्य मूल्यातील फरकाची भरपाई भरून काढण्यासाठी आयात केलेल्या वस्तूंवर वाढीव कर लादले जातात. म्हणजेच हे देशांतर्गत उद्योगांचे संरक्षण करणारे शुल्क आहे.