आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 च्या दुसऱ्या सामन्यातही हिंदुस्थानी हॉकी संघाने खणखणीत विजयाची नोंद केली. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक विजेत्या संघाने आपली जोरदार कामगिरी ठेवताना जपानचा 5-1 असा धुव्वा उडवत दुसऱ्या जोरदार विजयाची नोंद केली.
रविवारी झालेल्या पहिल्या सामन्यात हिंदुस्थानने यजमान चीनचा 3-0 असा पराभव केला. हिंदुस्थानचा पुढील सामना 11 सप्टेंबरला मलेशियाविरुद्ध होणार आहे. 14 सप्टेंबर कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध लढाई होणार आहे. गतविजेत्या हिंदुस्थानसाठी सुखजीत सिंगने 2, अभिषेक आणि संजय आणि उत्तम सिंगने प्रत्येकी एक-एक गोल ठोकला. जपानकडून फक्त मात्सुमोतो काझुमासाला एकमेव गोल ठोकता आला.
पहिल्या 2 मिनिटांत दोन गोल
हिंदुस्थानी संघाने सामन्याच्या पहिल्या 2 मिनिटांत दोन गोल करत जपानला बॅकफूटवर पाठवले. सुखजीत सिंगने पहिला आणि अभिषेकने दुसरा गोल केला. हे दोन्ही गोल मैदानी होते हे विशेष. दुसऱ्या क्वार्टरची सुरुवातही गोलने झाली. सामन्याच्या 17 व्या मिनिटाला हिंदुस्थानला पेनल्टी कॉर्नर मिळाला. ज्याचे संजयने गोलमध्ये रूपांतर करत हिंदुस्थानची आघाडी 3-0 अशी वाढवली.
पहिल्या दोन क्वार्टरमध्ये अनेक संधी गमावल्यानंतर अखेर जपानने तिसऱ्या क्वार्टरच्या सुरुवातीला पहिला गोल केला. मात्सुमोतो काझुमासाने सामन्याच्या 41 व्या मिनिटाला मैदानी गोल करत संघाचे खाते उघडले. या क्वार्टरमध्ये हिंदुस्थानी संघाला एकही गोल करता आला नाही.
शेवटच्या सत्रात आणखी दोन गोल
हिंदुस्थानने शेवटच्या सत्रात सामना एकतर्फी केला. उत्तम आणि सुखजीत यांनी एकापाठोपाठ दोन गोल केले. सामन्याच्या 54व्या मिनिटाला उत्तम सिंगने तर सामन्याच्या शेवटच्या मिनिटाला सुखजीत सिंगने सामन्यातील दुसरा गोल करत हिंदुस्थानच्या 5-1 अशा महाविजयावर शिक्कामोर्तब केले.