‘आमची पूर्ण तयारी…’, अमेरिकेतील बेकायदा स्थलांतरितांच्या प्रश्नावर मोदींनी पहिल्यांदाच मांडली हिंदुस्थानची भूमिका

अमेरिकेचे दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष बनताच डोनाल्ड ट्रम्प यांनी बेकायदा स्थलांतरितांना त्यांच्या देशात हाकलून लावण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार विविध देशातील बेकायदा नागरिकांची आपापल्या देशात रवानगी करण्यात आली. हिंदुस्थानच्याही 104 बेकायदा नागरिकांना मायदेशी पाठवण्यात आले होते. मात्र या नागरिकांसोबत अतिशय अमानुष वर्तन करण्यात आले. हातात बेड्या, पायात साखळदंड बांधून त्यांना विमानत ढकलण्यात आले होते. यामुळे मोदी सरकारवर विरोधकांनी प्रचंड टीका केली होती. आता अमेरिका दौऱ्यावर गेलेल्या मोदी सरकारने बेकायदा स्थलांतरितांच्या प्रश्नावर पहिल्यांदाच हिंदुस्थानची भूमिका मांडली आहे.

अमेरिकेच्या दोन दिवसीय दौऱ्यावर गेलेल्या Prime Minister Narendra Modi यांनी व्हाईटहाऊसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. या भेटीनंतर दोघांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी मोदींनी बेकायदा स्तलांतरितांच्या प्रश्नावर भाष्य केले.

‘जे लोक अवैधरित्या दुसऱ्या देशात राहतात, त्यांना तिथे राहण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही. हिंदुस्थान आणि अमेरिकेबाबत बोलायचे झाल्यास, जे लोक हिंदुस्थानचे नागरिक आहेत आणि ते अवैधरित्या अमेरिकेमध्ये राहत असतील तर त्यांना हिंदुस्थानात आणण्याची आमची पूर्ण तयारी आहे’, असे मोदी म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, हिंदुस्थानातील तरुण, असुशिक्षित आणि गरीब लोकांना फसवले जाते. अतिशय सामान्य कुटुंबातील ही लोक असून त्यांना मोठी स्वप्न आणि मोठी आश्वासनांची आमिषे दाखवली जातात. अनेकांना तर हे देखील माहिती नसती की त्यांना इथे का आणले जाते. अनेकांना मानवी तस्करीद्वारेही येथे आणले जाते.

मानवी तस्करीचे रॅकेट उद्ध्वस्त करण्यासाठी अमेरिका आणि हिंदुस्थानने मिळून प्रयत्न करायला हवेत. यात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे हिंदुस्थानला सहकार्य करतील, अशी आशाही मोदींनी व्यक्त केली.