
सीरियात सत्तापालट झाल्यानंतर हिंदुस्थानच्या परराष्ट्र मंत्रालयाने तेथील परिस्थितीवर बारीक लक्ष असल्याचे सांगितले होते. त्यानुसार तेथे अडकलेल्या 75 हिंदुस्थानी नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार सर्वजण लेबनॉनला पोहोचले असून त्यांना व्यावसायिक विमानाने मायदेशात आणले जाईल. यामध्ये सीरियाच्या सईदा जैनबच्या दर्ग्यात गेलेल्या जम्मू-कश्मीरमधील 44 यात्रेकरूंचाही समावेश आहे. सीरियातील अडकलेल्यांना हिंदुस्थानच्या दूतावासाच्या संपर्कात राहण्याचा सल्ला परराष्ट्र मंत्रालयाने दिला आहे. तसेच तिथे उरलेल्या हिंदुस्थानी नागरिकांना मदतीसाठी आपत्कालीन हेल्पलाइन नंबर आणि ई-मेल आयडी देण्यात आला आहे. सीरियात बशर अल असद यांची सत्ता उलथवून बंडखोरांनी कब्जा मिळवला. बंडखोर गटाने अंतरिम सरकारची घोषणा केली असून, मोहम्मद अल-बशीर हा काळजीवाहू पंतप्रधान असेल.