
अपराजित हिंदुस्थानने पुन्हा एकदा सुवर्ण इतिहास रचला. नऊ महिन्यांपूर्वी वेस्ट इंडीजमध्ये टी-20 वर्ल्ड कपमध्ये जो पराक्रम केला होता त्याची दुबईतही पुनरावृत्ती केली. अपराजित राहात जगज्जेतेपद काबीज केले. एवढेच नव्हे तर 2000 साली न्यूझीलंडने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या जेतेपदाच्या लढतीत केलेल्या पराभवाची 25 वर्षांनंतर परतफेडही केली आणि तिसऱयांदा चॅम्पियन्स ट्रॉफीवर हिंदुस्थानचे नाव कोरले. आयसीसीच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात तिसऱयांदा चॅम्पियन्सचा बहुमान पटकावत आम्हीच ‘चॅम्पियन्स नंबर वन’ आहोत, हे क्रिकेटविश्वाला दाखवून दिले.
रोहित-गिल शतकी सलामी
अपयशाची झळ सोसणाऱया कर्णधार रोहित शर्माची बॅट तळपली आणि हिंदुस्थानच्या विजयाचा हायवे सुसाट झाला. रोहितने शुभमन गिलसोबत केलेल्या शतकी सलामीने न्यूझीलंडच्या आव्हानातील हवाच काढून टाकली होती. तरीही न्यूझीलंडच्या गोलंदाजांना मधल्या फळीला लवकर टिकून वाढवलेला रोमांच 49 व्या षटकांपर्यंत सामन्याला खेचून नेणारा ठरला. गिलने 50 चेंडूंत एका षटकारासह 31 धावा केल्या. कर्णधार मिचेल सॅण्टनरने गिलला फिलिप्सकरवी झेलबाद करून ही जोडी फोडली, मात्र त्यानंतर टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली आल्या पावली माघारी परतला. जेमतेम दोन चेंडूंचा सामना केलेल्या कोहलीला मायकल ब्रेसवेलने एका धावेवर पायचीत पकडून न्यूझीलंडला बहुमोल विकेट मिळवून दिली. रोहितने 83 चेंडूंत 76 धावा करताना 7 सणसणीत चौकारांसह 3 टोलेजंग षटकार ठोकले. रचिन रवींद्रला पुढे येऊन मैदानाबाहेर भिरकाविण्याच्या नादात तो फसला अन् टॉम लॅथमने त्याला आरामात यष्टीचित करून न्यूझीलंडला तिसरे यश मिळवून दिले.
मधल्या फळीची उपयुक्त फलंदाजी
विराट कोहली झटपट बाद झाल्याने आलेल्या श्रेयस अय्यरला दडपणात संयमी खेळ करावा लागला. त्यात रोहित शर्मा बाद झाल्याने त्याच्यावरील जबाबदारी वाढली. श्रेयसने अक्षर पटेलच्या साथीत धावफलक हलता ठेवला. 62 चेंडूंत 2 चौकार व 2 षटकारांसह 48 धावा करणाऱया श्रेयसला सॅण्टनरने रचिनकरवी झेलबाद केले. मग अक्षर पटेलही 40 चेंडूंत 29 धावा करून बाद झाला. त्याला ब्रेसवेलने ओ’रूर्ककरवी झेलबाद करून तंबूत धाडले. मग लोकेश राहुल (नाबाद 34) व हार्दिक पंडय़ाने (18) टीम इंडियाला विजयाच्या उंबरठय़ावर नेले. विजयासाठी 12 धावांची गरज असताना पंडय़ाला कायल जेमिसनने स्वतःच्या गोलंदाजीवर झेलबाद केले. पंडय़ाने 33 चेंडूंत एक चौकार व एका षटकारासह आपली नाबाद खेळी सजविली. चौकाराने सामना संपविणाऱ्या रवींद्र जाडेजाने नाबाद 9 धावा केल्या. न्यूझीलंडकडून मिचेल सॅण्टनर व माइकल ब्रेसवेल यांनी 2-2 फलंदाज बाद केले, तर जेमिसन, रचिन रवींद्र यांना 1-1 विकेट टिपला. झंझावाती सलामी देणारा रोहित शर्मा हिंदुस्थानच्या विजयाचा शिल्पकार ठरला तर स्पर्धेत 263 धावा आणि 3 विकेट टिपणारा रचिन रवींद्र ‘मालिकावीर’ ठरला.
कुलदीपने घेतली न्यूझीलंडची फिरकी
हिंदुस्थानने सलग 15 व्यांदा नाणेफेक गमावली अन् न्यूझीलंडने फलंदाजी घेतली. विल यंग (15) व रचिन रवींद्र (37) यांनी 7.5 षटकांत 57 धावांची सलामी देत न्यूझीलंडला आश्वासक सलामी दिली, मात्र या अर्धशतकी सलामीदरम्यान रचिनला दोन जीवदान मिळाले. शेवटी वरुण चक्रवर्तीने यंगला पायचित पकडून हिंदुस्थानला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर 11 व्या षटकात मोर्चावर आलेल्याय कुलदीप यादवने पहिल्याच चेंडूवर रचिनचा त्रिफळा उडवून न्यूझीलंडला दुसरा धक्का दिला. पुढच्याच षटकात त्याने धोकादायक केन विल्यम्सनला (11) स्वतःच्याच गोलंदाजीवर झेलबाद करून न्यूझीलंडची 12.2 षटकांत 3 बाद 75 अशी अवस्था केली.
मिचेल, माइकलची अर्धशतके
रवींद्र जाडेजाने टॉम लॅथमला (14) पायचित पकडून न्यूझीलंडला चौथा धक्का दिला. मात्र त्यानंतर मधल्या फळीत डॅरिल मिचेल (63), ग्लेन फिलिप्स (34) व माइकल ब्रॅकवेल (नाबाद 53) यांनी चांगली फलंदाजी करीत न्यूझीलंडला 7 बाद 251 अशा समाधानकारक धावसंख्येपर्यंत पोहोचविले. मिचेल आणि फिलिप्स यांनी पाचव्या विकेटसाठी 57 धावांची भागीदारी केली. चक्रवर्तीने एका अप्रतिम चेंडूवर फिलिप्सचा त्रिफळा उडवून हिंदुस्थान बहुमोल बळी मिळवून दिला. फिलिप्सने 52 चेंडूंत 34 धावा करताना 2 चौकारांसह एक षटकार लगावला. मग डॅरिल मिचेल व आलेला माइकल ब्रॅकवेल यांनी 47 चेंडूंत 46 धावांची फटकेबाजी करीत न्यूझीलंडला दोनशेचा टप्पा ओलांडून दिला. 101 चेंडूंत 3 चौकारांसह 63 धावांची खेळी करणाऱया मिचेलला मोहम्मद शमीने रोहितकरवी झेलबाद करीत न्यूझीलंडला सहावा धक्का दिला. मग कर्णधार मिचेल सॅण्टनर 8 धावांवर धावबाद झाला. ब्रॅकवेलने 40 चेंडूंत 3 चौकार व 2 षटकारांसह नाबाद अर्धशतकी खेळी सजवित न्यूझीलंडला अडीचशेपार नेले. हिंदुस्थानकडून वरुण चक्रवर्ती व कुलदीप यादव यांनी 2-2 फलंदाज बाद केले, तर मोहम्मद शमी व रवींद्र जाडेजा यांना 1-1 बळी मिळाला.
हिंदुस्थानी खेळाडूंनी सोडले चार झेल
फायनलसारख्या सामन्यात हिंदुस्थानी खेळाडूंनी चक्क चार झेल सोडल्याने न्यूझीलंडला अडीचशे धावांचा टप्पा गाठता आला. मोहम्मद शमीने आपल्या सातव्या षटकातील तिसऱया चेंडूवर रचिन रवींद्रचा झेल सोडला. शमीच्या हाताला चेंडू लागला अन् खाली पडला. त्यानंतर पुढच्याच षटकात वरुण चक्रवर्तीच्या पहिल्याच चेंडूवर रचिनला दुसरे जिवदान मिळाले. श्रेयस अय्यरने डीप मिड विकेटला त्याचा झेल सोडला. मग अक्षर पटेलच्या 35 व्या षटकात रोहित शर्माने डॅरियल मिचेलचा झेल सोडला. याच मिचेलने 63 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्यानंतर रवींद्र जाडेजाच्या 36 व्या षटकात शुभमन गिलने ग्लेन फिलिप्सचा झेल सोडला. फिलिप्सने 52 चेंडूंत 34 धावांची खेळी केली.
निवृत्तीची अफवाच ठरली
आज दुपारपासूनच सोशल मीडियावर रोहित शर्माच्या निवृत्तीची अफवा आघाडीवर होती. आज चॅम्पियन्स होताच रोहित आपल्या क्रिकेट कारकीर्दीला रामराम करणार, असे वातावरण निर्माण केले होते. सामन्यापूर्वी विराटला रोहितला मारलेली मिठी पाहून वेगळे तर्कवितर्कही लढवले जात होते. तसेच काहींचे म्हणणे होते की संघ हरल्यावर रोहित आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होईल, मात्र जिंकलो तर तो अजून काहीकाळ खेळेल. पण हिंदुस्थानला नऊ महिन्यांत दुसर्यांदा जगज्जेते बनवल्यानंतर रोहितने आपल्या निवृत्तीच्या विचारांनाही तिलांजली दिली. मी माझ्या निवृत्तीबाबत अद्याप कोणताही विचार केला नसल्याचे सांगत अजूनही काहीकाळ वन डे आणि कसोटी क्रिकेटचा आनंद उपभोगणार असल्याचे सांगितले.
रोहित करतोय धोनीचा पाठलाग
हिंदुस्थानी संघासाठी महेंद्रसिंग धोनीने आयसीसी वर्ल्ड कप, टी-20 वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी अशा स्पर्धा जिंकल्या होत्या. आता रोहितही त्याचा पाठलाग करतोय. रोहितला 2023 चा वर्ल्ड कप जिंकता आला नाही. मात्र त्याने 2024 चा टी-20 वर्ल्ड कप आणि आता चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकत आपले दुसरे यश संपादले. कपिल देवने 1987 सालचा वर्ल्ड कप जिंकल्यानंतर 2002 साली हिंदुस्थानने श्रीलंकेबरोबर चॅम्पियन्स ट्रॉफीच संयुक्त विजेतेपद पटकावले होते. त्या स्पर्धेत सौरभ गांगुली हिंदुस्थानचा कर्णधार होता.
ऑस्ट्रेलियाला हरवल्यानंतर जगज्जेते; चौथ्यांदा योगायोग खरा ठरला
हिंदुस्थानने उपांत्यपूर्व सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव केला तेव्हाच आपले चॅम्पियन्सचे जेतेपद निश्चित केले होते. कारण ज्या आयसीसी स्पर्धेत हिंदुस्थानने बाद फेरीत किंवा उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाला धक्का देण्यात यश मिळवलेय तेव्हा जगज्जेतेपदही जिंकलेय. सलग चौथ्यांदा हा योगायोग जुळून आलाय. 2007 आणि 2024 चे टी-20 वर्ल्ड कप, या दोन्ही स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला हरवल्यानंतरच आपण जगज्जेते ठरलो आणि 2011 चा वर्ल्ड कपही धोनीने उपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलियाला हरवल्यानंतर जिंकला होता. आता रोहितनेही तीच किमया साधताना ऑस्ट्रेलियाला उपांत्य फेरीत हरवल्यानंतर हिंदुस्थानला कोणी रोखू शकत नाही, हे पुन्हा सिद्ध झालेय.
हिंदुस्थानात उत्साहाला उधाण
गेल्या वर्षी टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर जो माहैल अवघ्या हिंदुस्थानात होता, त्याची पुनरावृत्ती आजही झाली. हिंदुस्थानच चॅम्पियन्स होणार या ध्येयाने क्रिकेटप्रेमींनी आजचा सण्डे ब्लॉक केला होता आणि रवींद्र जाडेजाच्या बॅटमधून विजयी चौकार निघताच ‘भारत माता की जय’चा घोष सुरू झाला तो वाढतच गेला. आज दुपारपासूनच सारे क्लब, थिएटर्सच नव्हे तर सोसायटींना मैदानाचे स्वरूप प्राप्त झाले होते. विजयानंतर क्रिकेटप्रेमींनी जागोजागी बाईक रॅली आणि जल्लोष यात्रा काढून आपला विजयोत्सव साजरा केला.
दुबईत गावसकरांचा मुंबई डान्स
खेळाडूंकडून चुका झाल्यावर वडीलधारी व्यक्ती या नात्याने त्यांचे कान उपटणाऱ्या सुनील गावसकरांनी हिंदुस्थानी संघ चॅम्पियन्स होताच दुबईत मुंबई डान्स करून आपला आगळावेगळा आनंद व्यक्त केला. गेल्यावर्षी टी-20 वर्ल्ड कपचे जेतेपद पटकावल्यानंतरही गावसकरांनी टीम इंडियाचे नुसते काwतुकच केले नव्हते तर आपल्या शैलीत नृत्य करून आपला आनंदही व्यक्त केला होता. आज त्याची पुनरावृत्ती झाली आणि त्यांचा आनंदही गगनात मावेनासा झाल्याचे अवघ्या जगाने पाहिले.