हिंदुस्थानी महिलांची अजिंक्यपंचमी

जिंकून जिंकून जिंकणार कोण, याची अवघ्या आशियाला कल्पना होती आणि ती कल्पना पाचव्यांदा हिंदुस्थानी महिला कबड्डी संघाने प्रत्यक्षात साकारत सहाव्या ‘महिला आशियाई अजिंक्यपद कबड्डी स्पर्धे’त अजिंक्यपंचमी साजरी केली. हिंदुस्थानने या स्पर्धेत सलग पाच सामने जिंकत अंतिम सामन्यात इराणचा 32-25 अशा गुणफरकाने धुव्वा उडवीत ही कामगिरी साकारली. फक्त एकदाच दक्षिण कोरिया संघाने या स्पर्धेचे विजेतेपद मिळविले.

आशियाई अजिंक्यपद कबड्डी

अंतिम सामन्यात संघनायिका सोनाली शिंगटे, पूजा यांच्या धारदार चढाया आणि त्यांना साक्षी शर्मा, ज्योती यांची मिळालेली पकडीची साथ यामुळेच हिंदुस्थानला या जेतेपदावर मोहोर उमटविणे सोपे गेले. या स्पर्धेत एकूण सात देशांचे संघ सहभागी झाले होते. हिंदुस्थानचा समावेश ‘अ’ गटात होता. त्या गटात बांगलादेश, थायलंड व मलेशिया हे संघ होते. साखळी सामन्यात हिंदुस्थानी संघाने सर्व सामने एकतर्फी जिंकत अव्वल स्थान मिळविले होते. उपांत्य सामन्यात हिंदुस्थानने नेपाळचा 56-18 असा पराभव करीत अंतिम फेरी गाठली होती. तेहरानला या स्पर्धा आयोजनाची दुसऱयांदा संधी मिळाली. याआधी 2007 साली तेहरानमध्ये प्रथमच ही स्पर्धा झाली होती.