‘INDIA आघाडी 300 पार’; नाना पटोलेंचा मोठा दावा

Lok Sabha Election 2024: देशातील मतदानाचा शेवटचा टप्पा शनिवारी पार पडणार आहे. यानंतर सगळ्यांना वेध लागतील ते निकालाचे. विविध पक्ष आतापर्यंत झालेल्या मतदानाच्या टप्प्यांवरून अंदाज बांधत आहेत. मोदी सरकार वारंवार 400 पारची भाषा करत असले तरी प्रत्यक्षात INDIA आघाडी 300 हून अधिक जागा जिंकत असल्याचा मोठा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केला आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

महाराष्ट्रात महाविकास आघाडी मोठी आघाडी घेणार अशा प्रकारचे वृत्त निवडणुकांच्या आधी प्रसिद्ध झालेल्या विविध सर्व्हेतून देण्यात आलं होतं. निवडणुकांच्यादरम्यान देखील महाविकास आघाडीच्या उमेदवारांना चांगलाच प्रतिसाद मिळाल्याचं महाविकास आघाडीचे नेते सांगत आहेत. ‘राज्यात 40 हून अधिक जागांवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय होणार आहे. इंडिया आघाडी देशात 300 जागांहून अधिक जागा जिंकेल असं चित्र आहे’, असा दावा नाना पटोले यांनी केला आहे.
‘निवडणुका ज्यावेळी सुरू झाल्या होत्या त्यावेळी आम्ही मोदींविषयी जनतेच्या मनात रोष असल्याचं सांगितलं होतं. देशाचं संविधान सुरक्षित नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मतदारांचा अपमान केला आहे’, असा आरोपही त्यांनी केला आहे.

राज्या सरकारच्या धोरणांवर टिका करतानाच शेतकऱ्यांचे कसे हाल सुरू आहेत याकडे देखील त्यांनी लक्षं वेधलं. निवडणुकांच्या काळात महाराष्ट्रात 267 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मात्र सरकार प्रचारात व्यस्त असल्याचा आरोपही त्यांनी केला. कर्जमाफी नाही, शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, शेतकऱ्यांना मदत दिली नाही याबाबत निवडणूक काळात आपण राज्याचे मुख्यमंत्री आणि मुख्यसचिव यांना पत्र लिहिल्याचं देखील त्यांनी अधोरेखित केलं.

पंतप्रधान मोदी यांना दिंडोरीच्या सभेत एका शेतकऱ्याने कांद्यावर बोला असं म्हणाला म्हणून त्याच्यावर लगेच गुन्हा दाखल केला. म्हणजे शेतकऱ्यांना आपली भूमिका मांडण्याचा अधिकार नाही, असा आरोपही त्यांनी केला.