Waqf Amendment Bill – चर्चेत सहभागी होणार आणि विधेयकाविरोधात मतदान करणार; इंडिया आघाडीची बैठकीत वज्रमूठ

लोकसभेत उद्या वक्फ सुधारणा विधेयक मांडण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर रणनीती आखण्यासाठी इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक दिल्लीत झाली. वक्फ सुधारणा विधेयकावरील चर्चेत विरोधी पक्ष सहभागी होतीली आणि विधेयकाविरोधात आपले मतदान करतील, असा निर्णय इंडिया आघाडीच्या बैठकीत एकमताने घेण्यात आला. लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे खासदार यावेळी उपस्थित होते. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार अरविंद सावंत आणि प्रियंका चतुर्वेदी हे या बैठकीत उपस्थित होते.

हे विधेयक एक लक्ष्यित कायदा आहे आणि ते मूलभूतपणे संविधानिक तरतुदींच्या विरुद्ध आहे. आम्ही या विधेयकाला विरोध करणार आहोत. इंडिया आघाडीच्या पक्षांनी एकमताने हा निर्णय घेतला आहे. आम्ही इतर समान विचारसरणीच्या राजकीय पक्षांनाही या विधेयकाविरोधात मतदान करावं, असं आवाहन काँग्रेसच्या के. सी. वेणुगोपाल यांनी केले आहे. तर आम्ही विधेयकावरील चर्चेत सक्रियपणे सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे आणि उद्या विधेयक मंजूर करण्याला जोरदार विरोध असेल, असे आरएसपीचे खासदार एन. के. प्रेमचंद्रन यांनी सांगितले.

रणनीतीचा प्रश्न नाही हा हक्कांचा प्रश्न आहे. एका सशक्त लोकशाहीत मनमानी पद्धतीने देश चालत नाही. हा देश संविधानाने चालतो. आम्ही चर्चेत भाग घेऊ. जे संविधानासोबत आहेत त्यांच्यासोबत आम्ही आहोत. इंडिया आघाडीच्या नेत्यांची एक चांगली चर्चा बैठकीत झाली. आम्ही उद्या पूर्ण ताकदीने आणि एकजूट होऊन चर्चेत सहभागी होऊ, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी वक्फ सुधारणा विधेयकाविरोधात आपली भूमिका मांडली.

विधेयकावर संसदेची संयुक्त समिती (JPC) नेमली होती, तेव्हाही आणि आताही आम्ही एकजूट आहोत. सरकारने जे काही विधेयकात आणलेलं आहे ते देशाला विभाजनाकडे नेणारं आहे. आम्ही चर्चेत सहभागी होऊ आणि आमचे मुद्दे मांडू, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार अरविंद सावंत यांनी सांगितले. तर इंडिया आघाडीतील सर्व पक्ष चर्चेत सहभागी होतील. विरोधी पक्षांकडून ज्या सूचना केल्या जातील त्याला पाठिंबा दिला जाईल. आणि मतविभाजनाची मागणी करू, असे समाजवादी पार्टीचे राम गोपाल यादव यांनी स्पष्ट केले.