संसदेत आंदोलनादरम्यान प्रियंका गांधी, खरगेंना धक्काबुक्की, काँग्रेसने शेअर केला व्हिडिओ; आम्ही घाबरणार नाही, राहुल गांधींची प्रतिक्रिया

संसदेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी संसदेच्या प्रवेशद्वारावरील पायऱ्यांवर आज धक्काबुक्कीची घटना घडली आहे. सत्ताधारी भाजपच्या खासदारांनी आंदोलन करणाऱ्या इंडिया आघाडीच्या खासदारांना संसदेत प्रवेश करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी भाजप खासदारांनी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना धक्काबुक्की करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. तर या धक्काबुक्कीत भाजपचे दोन खासदार जखमी झाले आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्यानंतर संसद परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर इंडिया आघाडीतील नेत्यांनी आंदोलन केले. लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांच्यासह सर्व खासदारांनी निळ्या रंगाचे कपडे परिधान करून आंदोलन केले. अमित शहा यांनी माफी मागावी अशी मागणी यावेळी विरोधी पक्षांनी केली.

आंदोलनानंतर इंडिया आघाडीचे खासदार संसदेत प्रवेश करत होते. इंडिया आघाडीच्या खासदारांना भाजपच्या खासदारांनी संसदेत प्रवेश करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी धक्काबुक्कीची घटना घडली. सत्ताधारी भाजपचे खासदार कशा प्रकारे इंडिया आघाडीतील खासदारांना रोखत होते, याचा व्हिडिओ समोर आला आहे. संसद परिसरातील या घटनेचा व्हिडिओ काँग्रेसने शेअर केला आहे. यावेळी झालेल्या धक्काबुक्कीच्या घटनेत भाजप खासदार प्रताप सारंगी जखमी झाले आहेत. राहुल गांधी यांनी एका खासदाराला धक्का दिला. ते खासदार आपल्या अंगावर पडले आणि मी खाली कोसळलो, असा आरोप जखमी भाजप खासदार सारंगी यांनी केला आहे. तसेच धक्काबुक्कीत भाजप खासदार मुकेश राजपूतही जखमी झाले आहेत. या दोन्ही खासदारांना RML हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

धक्काबुक्कीला आम्ही भीत नाही- राहुल गांधी

तुमच्या कॅमेऱ्यात सर्वकाही रेकॉर्ड झालं असेल. संसदेत जाण्याचा मी प्रयत्न करत होतो. त्यावेळी भाजप खासदारांनी मला रोखलं आणि मागे ढकलत होते आणि धमकवत होते. प्रियंका गांधीनाही धक्काबुक्की करण्यात आली. पण आम्ही घाबरणार नाही. मात्र, हे संसदेचं प्रवेशद्वार आहे. संसदेत जाण्याचा आम्हाला अधिकार आहे. आणि भाजप खासदार आम्हाला आतमध्ये जाण्यापासून रोखत होते. सरकार संविधानावर आक्रमण करत आहे. आंबेडकरांच्या स्मृतीचा अपमान करत आहेत, असे सांगत लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपच्या खासदारांचा धक्काबुक्कीचा आरोप फेटाळून लावला.

धक्काबुक्कीच्या घटनेची चौकशी व्हावी- खरगे

काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभा विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी संसदेतील धक्काबुक्की प्रकरणी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिले आहे. या घटनेची चौकशी करावी. आपल्याला झालेली धक्काबुक्की म्हणजे माझ्यावर वैयक्तीक हल्ला नसून राज्यसभा विरोधी पक्षनेता आणि काँग्रेस अध्यक्षावर हल्ला आहे, असे खरगे यांनी पत्रात म्हटले आहे.