हिंदुस्थान ठरला लिजंड्स जगज्जेता; अजिंक्यपदाच्या लढतीत पाकिस्तानचा धुव्वा

युवराज सिंगच्या नेतृत्वाखालील हिंदुस्थान चॅम्पियन्स संघाने कट्टर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान चॅम्पियन्स संघाचा धुव्वा उडवित ‘वर्ल्ड चॅम्पियन्स ऑफ लिजंड्स’ किताबावर आपले नाव कोरले. अंबाती रायुडूचे अर्धशतक व अनुरित सिंगची भन्नाट गोलंदाजी ही हिंदुस्थानच्या विजयाची वैशिष्टय़े ठरली.

रायुडू-गुरकिरतची फटकेबाजी

पाकिस्तानकडून मिळालेले 157 धावांचे लक्ष्य हिंदुस्थानने 19.1 षटकांत 5 बाद 159 धावा करीत सहज पूर्ण केले. रॉबिन उथप्पा (10) व अंबाती रायुडू (50) यांनी हिंदुस्थानला 16 चेंडूंत 34 धावांची वेगवान सलामी दिली. आमीर यामिनने उथप्पाला सोहिल खानकरवी झेलबाद करून ही जोडी पह्डली. त्यानंतर सुरेश रैनाही एक सुंदर चौकार ठोकून याच षटकात आल्यापावली माघारी परतला. सोहेल तन्वीरने त्याचा झेल टिपला. त्यानंतर रायुडू व आलेला गुरकिरत सिंह मन (34) यांनी तिसऱया विकेटसाठी 49 चेंडूंत 60 धावांची भागीदारी करीत हिंदुस्थानला धावांची शंभरी ओलांडून दिली. 30 चेंडूंत 5 चौकार व 2 षटकारांसह अर्धशतकी खेळी साजरी केल्यानंतर सईद अजमलला मैदानाबाहेर भिरकविण्याच्या नादात रायुडूने शार्जिल खानकडे झेल दिला. गुरकिरतने 33 चेंडूंत 2 चौकार व एका षटकारासह 34 धावा केल्या. शोएब मलिकने त्याला यष्टीमागे कामरान अकमलकरवी झेलबाद केले.

युसूफचा पठाणी तडाखा

त्यानंतर कर्णधार युवराज सिंग (नाबाद 15) व युसूफ पठाण (30) यांनी  52 धावांची भागीदारी करीत हिंदुस्थानला विजयाच्या उंबरठय़ावर आणले. युसूफने 16 चेंडूंत एका चौकारांसह तीन षटकारांचा घणाघात केला. तो बाद झाल्यानंतर युवीने इरफान पठाणच्या (नाबाद 5) साथीत हिंदुस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. पाकिस्तानकडून आमीर यामिनने 2, तर सईद अजमल, वहाब रियाझ व शोएब मलिक यांनी प्रत्येकी एक विकेट मिळविला.

हिंदुस्थानी गोलंदाजांचा टिच्चून मारा

नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱया पाकिस्तानला हिंदुस्थानने 6 बाद 156 धावसंख्येवर रोखून अर्धी लढाई येथेच जिंकली होती. अनुरित सिंगने शार्जिल खानला (12) दुसर्याच षटकात राहुल शुक्लाकरवी झेलबाद करून हिंदुस्थानला आश्वासक सुरुवात करून दिली. त्यानंतर कामरान अकमल (24), सोहैब मकसूद (21), शोएब मलिक (41), मिसबाह उल-हक (18) व सोहैल तन्वीर (नाबाद 19) यांनी उपयुक्त फलंदाजी करीत पाकिस्तानला दीडशे धावांचा टप्पा ओलांडून दिला. मात्र हिंदुस्थानी गोलंदाजांनी भन्नाट गोलंदाजी केल्याने पाकिस्तानला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली नाही. हिंदुस्थानकडून अनुरित सिंगने 43 धावांत 3 विकेट टिपले.