हिंदुस्थानने दुसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेला नमवत इतिहास रचला. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 7 गडी राखून धुव्वा उडवला आणि मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. कोणत्याही आशियाई संघाला जे जमले नाही ते हिंदुस्थानच्या संघाने करुन दाखवले आहे. विजयासोबतच केपटाऊनमध्ये कसोटी जिंकणारा हिंदुस्थान पहिला आशियाई संघ ठरला आहे.
हिंदुस्थानने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केपटाऊन कसोटी सामन्यात 7 गडी राखून विजय मिळवला. या विजयासोबत केपटाऊनमध्ये टीम इंडियाचा हा पहिलाच कसोटी विजय ठरला. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियासमोर विजयासाठी 79 धावांचे माफक आव्हान होते, जे त्यांनी 3 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. सेंच्युरियन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाला एक डाव आणि 32 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने कमबॅक करत दक्षिण आफ्रिकेला पराभवाची धूळ चारली आणि दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.
हिंदुस्थानचा संघ 1992 पासून दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर द्विपक्षीय कसोटी मालिका खेळत आहे, परंतु केपटाऊनमध्ये कसोटी जिंकने टीम इंडीयाला शक्य झाले नाही. केपटाऊनमध्ये आतापर्यंत 6 कसोटी सामने टीम इंडीया खेळली आहे. या 6 कसोटी सामन्यांमध्ये टीम इंडीयाला 4 वेळा पराभव स्वीकारावा लागला, तर 2 सामने अनिर्णित राहिले होते. त्यामुळे हिंदुस्थानने दुसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत केपटाऊनमधील पराभवाचा दुष्काळ संपवला आहे. विशेष म्हणजे केपटाऊनमध्ये कोणत्याही आशियाई देशाला कसोटी सामना आतापर्य़ंत जिंकता आलेला नव्हता. त्यामुळे केपटाऊनमध्ये कसोटी सामना जिंकणारा हिंदुस्थान पहिला आशियाई देश ठरला.
दुसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात गोलंदाजांचे वर्चस्व पहायला मिळाले. नोणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला मोहम्मद सिराजने गुंडाळले आणि दक्षिण आफ्रिकचा संघ पहिल्या डावात केवळ 55 धावांवर बाद झाला. मोहम्मद सिराजने 9 षटकांत 15 धावा दिल्या आणि 6 बळी घेतले. सिराजची कसोटी क्रिकेट मधील ही सर्वोत्तम गोलंदाजी होती. सिराजला जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमार यांनी मोलाची साथ दिली.
पहिल्या डावात हिंदुस्थानच्या फलंदाजांना लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. टीम इंडियाचा पहिला डाव अवघ्या 153 धावांत आटोपला होता. टीम इंडियाची धावसंख्या चार बाद 153 होती. त्यामुळे ते 200 चा टप्पा सहज गाठतील असे वाटले होते. मात्र त्यानंतर फलंदाजांनी अत्यंत लाजिरवाणा खेळ दाखवला. 153 च्या पुढे एकही धाव न घेता शून्यावर तब्बल सहा खेळाडू बाद झाले. पहिल्या दिवसाच्या शेवटच्य़ा सत्रात टीम इंडीयाने फक्त 11 चेंडूत 6 विकेट गमावल्या. जाडेजा, बुमराह, सिराज, मुकेश आणि प्रसीध यांना भोपळा सुद्धा फोडता आला नाही. दक्षिण आफ्रिकेकडून कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी आणि नांद्रे बर्गर यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. दिवस संपला तेव्हा दक्षिण आफ्रिकेने 3 गड्यांच्या मोबदल्यात 62 धावा केल्या होत्या.
सामन्याच्या दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा संघ आपल्या दुसऱ्या डावात तीन गड्यांच्या मोबदल्यात 62 धावा करत मैदानात उतरला. दुसऱ्या दिवशी पहिल्याच षटकात जसप्रीत बुमराहने डेव्हिड बेडिंगहॅमला बाद करत आफ्रिकेला मोठा धक्का दिला. जसप्रीत बुमराहच्या भेदक माऱ्यापुढे आफ्रिकेच्या संघाचा निभाव लागला नाही. बुमराहने आफ्रिकेचा अर्ध्या संघाला तंबुचा रस्ता दाखवला. सहा विकेट पडल्यानंतर एडन मार्करामने एकट्याने खिंड लढवत 99 चेंडूत आपले शतक पुर्ण केले. मार्करमने 17 चौकार आणि दोन षटकारांसह 106 धावा केल्या त्याला मोहम्मद सिराजने बाद केले. मार्कराम बाद झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव 176 धावांवर आटोपला. जसप्रीत बुमराहने दुसऱ्या डावात सहा विकेट घेतल्या. मुकेश कुमारला दोन विकेट तर प्रसिध कृष्णा आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
टीम इंडियाकडे 98 धावांची आघाडी असल्याने दक्षिण आफ्रिकेने हिंदुस्थानला विजयासाठी 79 धावांचे लक्ष्य दिले होते. दुसऱ्या डावात यशस्वी जयसवाल 28 धावा करुन बाद झाला. विराट कोहली (12) आणि शुभमन गिल (10) हे सु्द्धा स्वस्तात माघारी परतले. एका बाजूने रोहित शर्माने संयमी खेळ केला आणि 17 धावा करुन नाबाद राहतं हिंदुस्थानला विजय मिळवून दिला.
92 वर्षांपूर्वीचा विक्रम तुटला
हिंदुस्थाने या विजयासह 92 वर्षांपुर्वीचा जुना विक्रम मोडला आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यावेळी सुद्धा दक्षिण आफ्रिकेचा पराभव झाला होता. 1932 साली मेलबर्न (ऑस्ट्रेलिया) येथे रंगलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी सामन्यात केवळ 656 चेंडू टाकण्यात आले होते. पहिल्या सत्रात दक्षिण आफ्रिकेला कांगारुंनी 36 धावात गुंडाळले होते आणि विजय संपादीत केला होता. आज झालेल्या हिंदुस्थान विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटीमध्ये चारही डाव मिळून केवळ 642 चेंडू टाकले गेले आणि 92 वर्षांपूर्वीचा विक्रम तुटला.