महाआघाडी विधानसभेला 180 पेक्षा जास्त जागा जिंकणार; जयंत पाटील यांचा विश्वास

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 पैकी 8 उमेदवारांचा दणदणीत विजय झाला. विजयी खासदारांचे आज राष्ट्रवादी भवन येथे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी अभिनंदन केले. शरद पवार जिथे असतात तिथे स्ट्राईक रेट जास्तच असतो, लोकसभेत राष्ट्रवादीचा स्ट्राईक रेट 80 टक्के राहिला, असे याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले. विधानसभेत महाविकास आघाडी 180 पेक्षा जास्त जागा जिंकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयी उमेदवारांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत अभिनंदन सोहळा पार पडल्यानंतर पत्रकार परिषद घेण्यात आली. जयंत पाटील यांनी यावेळी या विजयाबद्दल राष्ट्रवादीच्या तमाम कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केले. ‘राष्ट्रवादीसह उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना, काँग्रेस व आघाडीतील घटक पक्षांनी एकत्र काम केले. त्यामुळे महाविकास आघाडीला 32 जागा मिळाल्या. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्या सभांमुळे महाराष्ट्रात सकारात्मक वातावरण निर्माण झाले. असे जयंत पाटील म्हणाले.

तुतारी आणि पिपाणीत गल्लत झाली
तुतारी आणि पिपाणी या चिन्हांमध्ये गल्लत झाली. तुतारीचे अनेक मते पिपाणीला मिळाली. नाहीतर साताऱ्यातही राष्ट्रवादीचा खासदार निवडून आला असता. साताऱयामध्ये राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे यांचा 32 हजार मतांनी पराभव झाला आणि तिथे पिपाणीला 37 हजार मते मिळाली. दिंडोरीतही पिपाणीला 1 लाख 45 हजार मते गेली. ती मते राष्ट्रवादीच्या भास्कर भगरे यांना मिळाली असती, असे सांगतानाच ही बाब निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून देऊ, असे जयंत पाटील म्हणाले.

मला बावनकुळेंची काळजी वाटतेय!
जयंत पाटील यांना यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी अजित पवार गटातील आमदारांच्या घरवापसीच्या चर्चांबद्दलही विचारले. राजकीय करिअरच्या भीतीने अजितदादांचे 15 आमदार शरद पवारांकडे परत येण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जाते. त्यावर थेट कोणतेही भाष्य करण्यास जयंत पाटील यांनी नकार दिला. पण सध्या माझ्या मोबाईलचा वापर वाढला आहे, असे सूचक वक्तव्य करून त्यांनी दादा गटाचे आमदार संपका&त असल्याचे संकेत दिले.