सात राज्यांतील पोटनिवडणुकीत ‘इंडिया’चा जयजयकार; भाजपचा दारुण पराभव

लोकसभा निवडणुकीत एनडीएला घाम फोडणाऱ्या ‘इंडिया’ आघाडीने सात राज्यांतील पोटनिवडणुकीत भाजपला जोरदार धक्का दिला आहे. बिहार, पश्चिम बंगाल, तामीळनाडू, मध्य प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि हिमाचल प्रदेश या राज्यांत झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत 13 पैकी 10 जागा ‘इंडिया’ आघाडीतील घटक पक्षांनी जिंकल्या आहेत. भाजपला केवळ 2 जागांवर यश मिळाले असून एका ठिकाणी अपक्ष उमेदवार विजयी झाला.

लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान काही आमदारांनी दिलेले राजीनामे, तसेच काही सदस्यांचा मृत्यू झाल्याने रिक्त झालेल्या विधानसभेच्या जागांसाठी 10 जुलै रोजी पोटनिवडणूक घेण्यात आली. यामध्ये ‘इंडिया’ आघाडीचे घटक पक्ष असणाऱ्या कॉँग्रेसला 4, तृणमूल कॉँग्रेसला 4, आम आदमी पार्टी आणि डीएमकेला प्रत्येकी एका जागेवर विजय मिळाला. मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेशमध्ये भाजपची प्रत्येकी एक जागा भाजपला मिळाली. बिहारमधील रुपौली मतदारसंघात अपक्ष उमेदवारांने सत्ताधारी जेडीयूच्या उमेदवाराचा पराभव करत बाजी मारली.

पश्चिम बंगालमध्ये तृणमूलची बाजी

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने चारही जागा जिंकत बाजी मारली. रायगंज, राणाघाट दक्षिण, मणिकतला आणि बागडा विधानसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांना पराभवाची धूळ चारली.

पंजाबमध्ये आप, तामीळनाडूत डीएमके

पंजाबमधील जालंधर पश्चिम मतदारसंघात आम आदमी पक्षाचे मोहिंदर भगत यांनी भाजप उमेदवाराचा 37 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. तामीळनाडूत डीएमकेचे अन्निर सिवा हे विक्रावंडी मतदारसंघातून विजयी झाले.

अमरवाडा येथे भाजपचा निसटता विजय

मध्य प्रदेशातील अमरवाडा येथील जागा भाजपने 3252 मतांनी जिंकली आहे. 17 व्या फेरीपर्यंत काँग्रेस आघाडीवर होती. शेवटच्या तीन फेऱ्यांमध्ये बाजी पलटली आणि भाजपचा विजय झाला. हिमाचलमध्ये मुख्यमंत्री सुखू यांचा जिल्हा असलेल्या हमीरपूर मतदारसंघात भाजपचे आशीष शर्मा विजयी झाले.

हिमाचल, उत्तराखंडमध्ये कॉँग्रेसचा बोलबाला

हिमाचल प्रदेशमधील देहरा, नगलगड विधानसभा मतदारसंघात कॉँग्रेस उमेदवारांनी भाजप उमेदवाराचा पराभव केला. हिमाचलचे मुख्यमंत्री सुखविंदर सुखू यांच्या पत्नी कमलेश ठाकूर यांनी देहरामधून भाजपचा 9265 मतांनी पराभव केला. उत्तराखंडमधील बद्रीनाथ आणि मंगलोर या दोन्ही जागांवर काँग्रेस उमेदवार विजयी झाले.

भाजपने विणलेले भय आणि भ्रमाचे जाळे तुटले आहे. हुकूमशाही पूर्णपणे नष्ट करून न्यायाचे राज्य प्रस्थापित करण्याची शेतकरी, तरुण, मजूर, व्यापारी आणि कर्मचाऱ्यांसह प्रत्येक वर्गाची इच्छा आहे. आपले जीवन सुधारण्यासाठी आणि संविधानाच्या रक्षणासाठी आता जनता पूर्णपणे ‘इंडिया’सोबत आहे.

– राहुल गांधी, लोकसभा विरोधी पक्षनेते