जनतेचा कौल हा मोदींच्या विरोधात, इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर खरगेंची प्रतिक्रिया

निवडणुकीच्या निकालानंतर जनमताचा कौल हा मोदींच्या विरोधात असल्याचं स्पष्ट झाल्याची प्रतिक्रिया काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिली आहे. निवडणुकीच्या निकालानंतर इंडिया आघाडीच्या दिल्ली येथे झालेल्या बैठकीनंतर ते बोलत होते.

यावेळी माध्यमांना प्रतिक्रिया देताना खरगे म्हणाले की, इंडिया आघाडी मोदींच्या हुकूमशाही राजवटीविरोधात सुरू असलेला लढा कायम राखणार आहे. आम्ही या लढ्यात योग्य वेळी योग्य ती पावलं उचलू आणि जनमताने मोदींना सत्तेत न आणण्याचा जो कौल दिला आहे, त्याचा आदर राखू, असंही खरगे यावेळी म्हणाले.

‘जनमताने दिलेल्या पाठिंब्यासाठी खरगे यांनी आभारही व्यक्त केले. हा निकाल म्हणजे भाजपच्या द्वेषाच्या, भ्रष्टाचाराच्या राजकारणाला देशाच्या जनतेने दिलेली सणसणीत चपराक आहे. हा निकाल संविधानाच्या रक्षणासाठी, महागाई, बेरोजगारी आणि भांडवलशाही विरोधात लोकशाही वाचवण्यासाठी आलेला जनादेश आहे.’

‘इंडिया’ आघाडीची ही बैठक काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी झाली. ही बैठक दीड तास चालली. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी, काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना (उद्धव बाळसाहेब ठाकरे) नेते खासदार संजय राऊत, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलीन, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, नॅशनल कॉन्फरन्सचे उमर अब्दुल्ला, ‘आप’चे संजय सिंह, माकप नेते सीताराम येच्युरी, आरजेडीचे तेजस्वी यादव, जेएमएमच्या कल्पना सोरेन यांच्यासह इंडिया आघाडीतील इतर मित्रपक्षांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते.