शहा यांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार, प्रजासत्ताक दिनापर्यंत देशव्यापी मोहीम राबवणार

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी आता काँग्रेससह इंडिया आघाडीचे नेते मोदी सरकारला अक्षरशः सळो की पळो करून सोडणार आहेत. देशभरात अमित शहा यांच्याविरोधात 26 जानेवारीपर्यंत जोरदार मोहीम उघडण्यात येणार असून त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जोरदार निदर्शने करण्यात येणार आहेत. काँग्रेस नेते दोन दिवस 150 हून अधिक शहरांमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत. 24 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. तर 27 डिसेंबर रोजी कर्नाटकातील बेळगाव येथे काँग्रेसचा मोठा मेळावा होणार आहे.

शहा यांच्या वक्तव्यामुळे अवघा देश दुखावला आहे. आजपर्यंत अमित शहा किंवा मोदींनी अद्याप माफी मागितलेली नाही. काँग्रेस हा मुद्दा प्रजासत्ताक दिनापर्यंत म्हणजेच 26 जानेवारीपर्यंत देशभरात उचलून धरणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे सरचिटणीस वेणुगोपाल यांनी आज दिली. दरम्यान, लोकसभा आणि राज्यसभेतील काँग्रेस खासदार आणि काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य देशभरातील 150 वेगवेगळ्या शहरांमध्ये पत्रकार परिषद घेऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी करतील, अशी माहिती काँग्रेस नेते पवन खेडा यांनीही यापूर्वीच दिली होती.

उत्तर देण्यासाठी भाजपचीही तयारी

काँग्रेसची तयारी पाहून भाजपनेही विरोधकांना उत्तर देण्यासाठी तयारी सुरू केली आहे. पक्षाने पक्षातील अनुसूचित जाती आणि जमाती आघाडीला विधानसभेच्या सर्व जागांवर काऊंटर मोहीम आखण्यास सांगितले आहे. पक्ष तळागाळातील विरोधकांचा पर्दाफाश करण्यासाठी मोहीम सुरू करणार असून पक्ष दलितविरोधी घोषणा आणि विरोधी पक्षांच्या आधीच्या सरकारांनी उचललेली पावले अधोरेखित करणार असल्याचे पक्षाचे एससी-एसटी मोर्चाचे अध्यक्ष रामचंद्र कनौजिया यांनी सांगितले. या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या संघटनात्मक निवडणुकांनंतर लगेचच या मोहिमेला सुरुवात होणार असल्याचे ते म्हणाले.