महावितरणच्या स्मार्ट प्रीपेड मीटरला इंडिया आघाडीचा तीव्र विरोध, स्मार्ट मीटरमुळे चार लाख लोक बेरोजगार होण्याची भीती

महावितरण कंपनीने राज्यातील सर्व ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर लावणार असल्याचे जाहीर केले आहे. जनतेच्या रोषामुळे एकीकडे ऊर्जामंत्री फडणवीस यांनी स्मार्ट प्रीपेड मीटर मागे घेतल्याची घोषणा करूनही राज्य सरकारने आदेश काढलेला नाही. त्यामुळे स्मार्ट मीटर रद्दची ताबडतोब कार्यवाही करावी, या मागणीसाठी आज महाविकास आघाडीच्या वतीने आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन देण्यात आले.

दरम्यान, ठेकेदारधार्जिणे असलेल्या महावितरणच्या स्मार्ट प्रीपेड मीटरमुळे राज्यभरातील चार लाख लोक बेरोजगार होण्याची भीती आहे. या स्मार्ट मीटरच्या विरोधात महाविकास आघाडीकडून व्यापक लढा उभारण्याचा इशाराही सतेज पाटील यांनी दिला.

महावितरण कंपनीने राज्यातील सर्व ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर्स लावणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच हे मीटर्स खासगी कंपनीच्या खर्चाने मोफत लावणार, अशी फसवी आणि चुकीची जाहिरात करण्यात आली आहे. या संदर्भात निविदा मंजूर करण्यात आली आहे. लवकरच सर्वत्र स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्याची मोहीम सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. एकीकडे हे मीटर मोफत लावले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पण केंद्र सरकारचे अनुदान वगळता या मीटरचा उर्वरित सर्व खर्च, वीजदरनिश्चिती याची आयोगाकडे मागणी केली जाईल.

आयोगाच्या आदेशानुसार वीजदरवाढीच्या रूपाने एक एप्रिल 2025 पासून ग्राहकांच्या खिशातूनच हा खर्च वसूल केला जाणार हे जवळपास स्पष्ट आहे. त्यामुळे केवळ महावितरण आणि येणाऱ्या खासगी कंपन्या तसेच सरकारचे हित यातून महावितरणच्या खासगीकरणाचा पुढचा टप्पा म्हणूनच स्मार्ट प्रीपेड मीटर ग्राहकांच्या माथी मारले जाणार असल्याचा आरोपही करण्यात आला. आमदार सतेज पाटील यांनी स्मार्ट प्रीपेड मीटरचा निर्णय चुकीचा असल्याचे यावेळी सांगितले. येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात याबाबत आवाज उठवला जाईल, असेही सतेज पाटील यांनी सांगितले. मीटर रीडिंग घेण्यासाठी येणारे राज्यभरातील जवळपास चार लाख लोक स्मार्ट मीटरमुळे बेरोजगार होतील. त्यामुळे सरकार बेरोजगारी वाढवण्याचे काम करत आहे की काय, असा संतप्त सवालही आमदार सतेज पाटील यांनी केला.

यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते व जिल्हाप्रमुख संजय पवार, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, काँग्रेसचे सचिन चव्हाण, ‘आप’चे संदीप देसाई, महाराष्ट्र राज्य एरिगेशन फेडरेशनचे विक्रांत पाटील, बाजीराव पाटील, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आर. के. पोवार यांच्यासह महाविकास आघाडीतील विविध घटक पक्षांतील पदाधिकारी उपस्थित होते.

ग्राहकांचे लेखी अर्ज घेऊन आंदोलन उभे करणार प्रताप होगाडे

महावितरण ग्राहकाला स्मार्ट प्रीपेड मीटरची सक्ती करू शकत नाही. या विरोधात घरोघरी जाऊन जागृती करण्यासह ग्राहकांचे लेखी अर्ज घेऊन भविष्यात आंदोलन उभे केले जाईल, असेही महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी सांगितले.